दीपक केसरकरांचे वलय
By Admin | Updated: October 23, 2014 22:52 IST2014-10-23T20:57:22+5:302014-10-23T22:52:47+5:30
विधानसभा निवडणूक : सावंतवाडीत शिवसेनेला मताधिक्य

दीपक केसरकरांचे वलय
अनंत जाधव - सावंतवाडी -सावंतवाडी तालुक्याने विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांची पाठराखण करताना एकहाती २४ हजार १०० मतांचे मताधिक्य दिले. यामुळे तालुक्यात शिवसेनेसाठी केसरकरांचे वलयच फळाला आल्याचे दिसून येत आहे.
सावंतवाडी तालुका पूर्वीपासून काँॅग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, अलिकडेच या बालेकिल्ल्याला दीपक केसरकरांनी शिवसेनेत प्रवेश करत धक्का दिला आहे. तालुक्यातील बांदा हा भाजपचा पूर्वीपासूनचा गड आहे. तो आजही शाबित आहे. पण अनेक ठिकाणच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गडांना सुरुंग लागला आहे. लोकसभा निवडणुकीत केसरकरांनी दहशतवादाविरोधात घेतलेली भूमिका ही विधानसभा निवडणुकीत केसरकरांना फळाला आल्याचे दिसून आले आहे.
दीपक केसरकर हे मागच्या पाच वर्षात आघाडी सरकारचे आमदार होते. पण त्यांना अभिप्रेत असा विकास करता आलेला नाही. वेळोवेळी त्यांना नियोजनच्या बैठकीत डावलण्यात आले. ही त्यांची मोठी खंत होती. या विरोधात वेळोवेळी त्यांनी आवाज उठवला खरा पण या आवाजाला फारशी साथ मिळाली नाही. ना पक्षाकडून त्यांना पाठबळ मिळाले ना प्रशासनाकडून. त्यामुळे लोकशाही मार्गाने लढा देण्याचे ठरवत लोकसभा निवडणुकीत केसरकर यांनी घेतलेली भूमिका अख्ख्या महाराष्ट्राने उचलून धरली.
त्याचाच परिणाम त्यांना विधानसभा निवडणुकीत दिसला. दीपक केसरकर यांच्या विरोधात मनसे, भाजप, काँग्रेस यांनी चांगलेच दंड थोपटले होते. सर्व विरोधक एकत्र होऊन केसरकर यांच्या विरोधात लढत होते. पण केसरकरांनी आपले धैर्य सोडले नाही. केसरकरांना या विधानसभा निवडणुकीत ४१,४९९ चे मताधिक्य मिळाले. त्यातील सर्वाधिक मताधिक्य हे सावंतवाडी तालुक्याचे होते. दीपक केसरकर यांना सावंतवाडी तालुक्यात ३८ हजार ६९३ मते मिळविली. तर भाजपच्या राजन तेली यांना १४ हजार ५९३, काँग्रेसच्या बाळा गावडे यांना १४ हजार ६३१, राष्ट्रवादी काँॅग्रेसच्या सुरेश दळवी यांना २ हजार ७३५ तर परशुराम उपरकर यांनी ३ हजार ९४ मते मिळविली आहेत.
दीपक केसरकर यांच्या जवळपास एकही उमेदवार जाऊ शकला नाही. कारण दीपक केसरकर यांचे पूर्वीपासूनचे वलय नाकारता येत नाही. केसरकर हे जरी शिवसेनेत गेले तरी या तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व नव्हते.
ते केसरकरांच्या रूपाने सर्व जनतेला पाहता आले. केसरकर यांना खऱ्या अर्थाने सावंतवाडी शहराने साथ दिली. सावंतवाडी शहराने सर्वाधिक सात हजारांचे मताधिक्य दिले असल्याने केसरकर हे सर्वांनाच वरचढ ठरले आहेत.
सावंतवाडी पंचायत समितीमध्ये दीपक केसरकर यांची प्रमुख भूमिका होती. मात्र, चिठ्ठीच्या राजकारणात काँग्रेसने बाजी मारली तर सावंतवाडी नगरपालिकेवरही एकहाती वर्चस्व ठेवण्यात केसरकर हे यशस्वी ठरले आहेत. जिल्हा परिषद सदस्यही केसरकर यांच्या सोबतच असल्याने केसरकरांना आपले अस्तित्व राखण्यात यश आले.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीत सावंतवाडी तालुक्यात पाचव्या नंबरवर फेकला गेला आहे. केसरकर हे शिवसेनावासी झाल्यानंतर राष्ट्रवादीला आपला गड राखता आलेला नसल्याचेच या निवडणुकीत दिसून आले.
दळवी अपयशी
धर्मनिरपेक्षतेच्या नावावर निवडणुका जिंकण्याचा प्रचार करणारे व काँॅग्रेसमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रे्रेसमध्ये प्रवेश केलेले सुरेश दळवी यांना या निवडणुकीत पुरते अपयश आले आहे. प्रचार यंत्रणा पूर्णपणे त्यांनी राबविली होती. मागील निवडणुकीत त्यांनी घेतलेली १९ हजार मतेही आपल्याकडे वळवता आली नसल्याने पक्षाच्या वरिष्ठांकडून ते नाराजीचे धनी होत आहेत.