दीपक केसरकर भविष्यात शिंदे गटाशीही गद्दारी करतील, माजी राज्यमंत्री प्रविण भोसलेंनी लगावला टोला
By अनंत खं.जाधव | Updated: August 19, 2022 18:48 IST2022-08-19T17:47:08+5:302022-08-19T18:48:47+5:30
भविष्यात सावंतवाडीचा आमदार हा गद्दारी करणारा नसावा असाच निवडा.

दीपक केसरकर भविष्यात शिंदे गटाशीही गद्दारी करतील, माजी राज्यमंत्री प्रविण भोसलेंनी लगावला टोला
सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर यांनी कितीही म्हटले आपण पक्ष बदलले नाहीत तरी त्यांचा इतिहास कोण पुसू शकत नाही. त्यांचे राजकारण हे दगा फटक्याचेच राहिले आहे. भविष्यात ते शिंदे गटाशी ही गद्दारी करतील अशी टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केसरकरांना लगावला. तर, भविष्यात सावंतवाडीचा आमदार हा गद्दारी करणारा नसावा असाच निवडा असे आवाहनही यावेळी जनतेला केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते.
भोसले म्हणाले, आगामी काळात होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणार आहे. यात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. त्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा करू असेही भोसलेंनी यांनी सांगितले.
राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने पक्ष बांधणीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व्हावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व सहकार्य करेल. मात्र, अंतिम निर्णय वरिष्ठ नेते जो घेतील त्या निर्णयाची आम्ही अंमलबजावणी करू असेही भोसले म्हणाले.
शिंदे गटात गेलेले अनेक आमदार आम्ही शिवसेनेत असल्याचे सांगून मतदार संघात गेले, तेथे शक्तिप्रदर्शन केले. मात्र सावंतवाडीचे आमदार शिंदे गटात जाऊनही त्यांना शक्तिप्रदर्शन करता आले नाही. त्यामुळे आता त्यांची ताकद राहिली नसल्याचा टोलाही भोसले यांनी लगावला. त्यामुळे भविष्यात सावंतवाडी मतदारसंघातून निवडून येणारा आमदार हा गद्दारी करणार नाही असाच निवडून द्या असे आवाहन भोसले यांनी केले.