दीपक केसरकर पहिल्यांदाच करणार शक्तिप्रदर्शन, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार?
By अनंत खं.जाधव | Updated: August 10, 2022 18:44 IST2022-08-10T18:27:37+5:302022-08-10T18:44:23+5:30
हा मेळावा म्हणजे केसरकर यांचे शक्तिप्रदर्शनच मानले जात आहे

दीपक केसरकर पहिल्यांदाच करणार शक्तिप्रदर्शन, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार?
सावंतवाडी : शिंदे गटात सामील झाल्यानंतर आमदार दीपक केसरकर हे एक दोन वेळा सावंतवाडी आले पण मतदारसंघात त्यांनी इतर आमदारासारखे बैठका किंवा मेळावे घेतले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर सतत टीकेची झोड उठत होती. पण आता या टीकेला केसरकर येत्या शनिवारी 13 ऑगस्टला जाहीर मेळाव्यातून उत्तर देणार आहेत. हा मेळावा म्हणजे शिंदे गटात सामील झाल्यानंतरचे केसरकर यांचे शक्तिप्रदर्शनच मानले जात आहे.
काल, मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात केसरकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर प्रथमच ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.
महाराष्ट्रात दीड महिन्यापूर्वी मोठी राजकीय उलटापालट झाली. यात शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंडखोरी करत सत्तेतील महाविकास आघाडी सरकारला खाली खेचत नव्याने शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आणले. बंडखोरीनंतर अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघात जाऊन बैठका तसेच मेळावे घेत शक्तिप्रदर्शन केले होते. पण केसरकर या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन वेळा सावंतवाडीत आले पण त्यांनी ना कुठली बैठक घेतली किंवा ना मेळावा घेतला. यामुळे त्यांच्यावर सतत टीका होत होती.
शिवसेनेकडून आव्हान
केसरकरांनी आपले समर्थक कोण हे तरी दाखवावेत असे जाहीर आव्हानच शिवसेनेकडून देण्यात आले होते. तर सिंधुदुर्गात शिंदे समर्थक नसल्याचा उल्लेख भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला होता. शिवसंवाद यात्रे दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे सावंतवाडीत आले असता त्यांनी देखील केसरकर यांच्यावर टिका केली होती.
जाहीर मेळाव्यातून उत्तर देणार?
मात्र, आतापर्यंत शांत असलेल्या केसरकर यांनी मंत्रीपदाची माळ गळ्यात पडताच जाहीर मेळाव्यातून या सगळ्याना उत्तर देण्याचे ठरवले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर केसरकर पहिल्यांदा जिल्ह्यात येत असल्याने समर्थकांनी त्यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्यानिमित्ताने समर्थकांचा भव्य मेळावाही होणार आहे.
प्रथमच शक्तीप्रदर्शन
या मेळाव्याच्या माध्यमातून केसरकर हे प्रथमच शक्ती प्रदर्शन ही करणार आहेत. त्यामुळे हा मेळावा घ्यायचा की सभा? अन् कुठे घ्यायची याबाबत त्यांचे समर्थक माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे हे पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करत आहेत.