कामबंद आंदोलनाचा निर्णय

By Admin | Updated: November 7, 2014 23:38 IST2014-11-07T21:57:54+5:302014-11-07T23:38:40+5:30

संगणक परिचालक आक्रमक : गेल्या तीन वर्र्षापासून समस्या कायम

Decision for labor movement | कामबंद आंदोलनाचा निर्णय

कामबंद आंदोलनाचा निर्णय

सिंधुदुर्गनगरी : गेली तीन वर्षे अनेकवेळा प्रशासनाचे लक्ष वेधूनही ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) यांच्या समस्या मिटलेल्या नाहीत. वारंवार वाढणाऱ्या समस्यांना कंटाळलेल्या संगणक परिचालकांनी १२ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
१ एप्रिल २०११च्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संग्राम कक्षाची स्थापना करून संगणक परिचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र प्रामाणिकपणे काम करीत असतानाही शासनाने निर्धारीत केलेले ८ हजार रूपये मानधन त्यांना दिले जात नाही. त्याऐवजी ३५०० ते ३८०० एवढे तुटपुंजे मानधन देऊन संगणक परिचालकांची संबंधित ठेकेदारांकडून फसवणूक केली जाते. तसेच देण्यात येणारे मानधनही वेळेत देण्यात येत नाही. दोन-तीन महिने मानधन दिले जात नाही. याबाबत तक्रार केल्यास सेवेतून कमी करण्याची धमकी दिली जाते. संगणक परिचालकांच्या असंघटीतपणाचा, असहाय्यतेचा आणि बेकारीचा फायदा घेऊन संबंधित ठेकेदार कंपनीकडून त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार अवलंबला जात आहे. गेली ३ वर्षे अविरत काम करूनही संगणक परिचालकांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत. संपूर्ण राज्यात २७ हजारपेक्षा जास्त युवक-युवती हे काम करीत आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ३५०० एवढे जिल्ह्यातील तरूण-तरूणी या पदावर कार्यरत आहेत.
ग्रामपंचायतीत कार्यरत असणाऱ्या संगणक परिचालकांना शासन सेवेमध्ये कायम करण्यात यावे. वर्कआॅर्डरच्या नावाखाली कपात करण्यात येणारे वेतन वर्कआॅर्डर रद्द करून कपात केलेले वेतन मिळावे. शेअर्स म्हणून घेतलेली २०० रूपये रक्कम व्याजासह परत मिळावी. ८ हजार प्रमाणे वेतन दरमहा देण्यात यावे. दर महिन्याला १० तारखेपर्यंत वेतन खात्यावर जमा करण्यात यावे. जिल्हा व तालुकास्तरीय बैठकीचा प्रवास भत्ता मिळावा. निश्चित केलेल्या कामाव्यतिरिक्त जादा कामाचा मोबदला देण्यात यावा. सर्व संगणक परिचालकांना समान वेतन अदा करावे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा नाही अशांना अन्य ठिकाणी जाऊन काम करण्याचा प्रवासभत्ता मिळावा. संगणकासाठी देखभाल, दुरूस्ती, छपाई साहित्य वेळेत मिळावे.
संग्राम सॉफ्टवेअरमधून दिल्या जाणाऱ्या दाखल्यासाठी ३ ऐवजी ८ रूपये प्रोत्साहन अनुदान द्यावे. १० हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना दोन संगणक परिचालक द्यावेत. सर्व ग्रामपंचायतींमधील संग्राम कक्षामध्ये इंटरनेटसाठी ब्रॉडबॅन्ड कनेक्शन मिळावे आदी विविध मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत. (प्रतिनिधी)

विविध मागण्यांचे निवेदन सादर
शुक्रवारी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच वारंवार सतावणाऱ्या समस्यांमुळे १२ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यात बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच याबाबत तक्रार केल्यास सेवेतून कमी करण्याची धमकी दिली जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Decision for labor movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.