फळपीक विमा संरक्षण रकमेत कपातीचा निर्णय
By Admin | Updated: November 9, 2014 23:36 IST2014-11-09T21:34:04+5:302014-11-09T23:36:08+5:30
बागायतदारांना फटका : हप्त्यात घट होण्याची शक्यता

फळपीक विमा संरक्षण रकमेत कपातीचा निर्णय
रत्नागिरी : अवेळचा पाऊस व उच्चत्तम तापमान यामुळे आंबा आणि काजू पिकावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता शासनाने कृषी विभागाच्यावतीने हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना सुरू केली. मात्र, यावर्षी विमा रकमेत २५ ते ५० टक्के कपात केल्यामुळे शेतकरीवर्गाला त्याचा फटका बसणार आहे.
अवेळचा पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान या निकषावर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येते. त्यासाठी फळपीक विमा योजना सुरू केली. सुरूवातीला तापमान मोजमाप यंत्र चुकीच्या ठिकाणी बसविल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळाला नाही. गतवर्षी राबविलेल्या विमा योजनेबाबत अद्याप नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली नाही. यावर्षी विमा योजना चालू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, विमा संरक्षण यंत्रणेत २५ ते ५० टक्के कपात केल्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
आंबा, काजू, द्राक्ष, केळी, संत्री, मोसंबी, डाळिंब या पिकांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. आंबा पिकासाठी यावर्षी त्या रकमेत घट करून ७५ हजारावर आणली आहे. काजूला हेक्टरी सुधारित योजनेंतर्गत पूर्वीच्या रकमेत घट करून ती ५६ हजार २५० रूपयांवर आणली आहे. राज्यातील जळगाव, धुळे, बुलडाणा, बीड, वर्धा, नागपूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, अहमदनगर, लातूर, रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्याचा त्यात समावेश आहे. विमा कंपन्यांनी निवडक जिल्ह्यांसाठी पूर्वीीच्या विमा संरक्षित रकमेवर हरकत घेतल्याने विमा कंपनीच्या दबावापुढे झुकत कृषी विभागाने शेतकऱ्यांचा विचार न करता १६ आॅक्टोबरला विमा रकमेत २५ ते ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०११-१२ मध्ये १८६६.४७ हेक्टर बाधित क्षेत्रावरील १३६२ लाभार्थींना ३४ लाख ४१ हजार ५०० रूपये नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली. २०१२-१३ मध्ये ११२० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १२८६ लाभार्थींना २ कोटी ३२ लाख ७९ हजार ५०० रूपये नुकसान भरपाई देण्यात आली. सुरूवातीला विम्याचा हप्ता आठ हजार होता. मात्र, गतवर्षी त्या रकमेत वाढ करून ती १२ हजार रूपये करण्यात आली होती. राज्याचे ३०००, केंद्र शासनाचे ३०००, तर शेतकऱ्यांना ६००० रूपये भरावे लागले होते. मात्र, यावर्षी विमा सरंक्षण रकमेतच कपात केल्यामुळे हप्त्यात घट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी फळपीक विमा योजना सुरू केली आहे की, विमा कंपन्यांच्या रक्षणासाठी? दरवर्षी संबंधित निकषामध्ये बदल केला जातो. हवामनावर आधारित पथदर्शी फळपीक विमा योजना राबवताना भौगोलिक परिस्थितीचाही विचार केला जाणे गरजेचे आहे. मात्र, त्यात अपेक्षित बदल केले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेकडे पाठ फिरविलेली दिसून येते. कर्जदारांना सक्तीची असतानादेखील काही शेतकऱ्यांनी ही योजना नाकारलेली दिसून येते.
- ए. एस. शितूत, रत्नागिरी.