हर्णै बंदरातील आगीत ६७ लाखांची हानी
By Admin | Updated: January 29, 2015 00:14 IST2015-01-28T23:30:31+5:302015-01-29T00:14:16+5:30
कारण अस्पष्ट : दहा बोटी, बर्फ सेंटर, मच्छी सेंटर जळून खाक; जिवितहानी नाही

हर्णै बंदरातील आगीत ६७ लाखांची हानी
दापोली : दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात काल, मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत दहा मच्छिमारी बोटी, बर्फ सेंटर, मच्छी सेंटर, जाळी, माशांचे टप, लाखो रुपये किमतीची मच्छी खाक झाली असून त्यात २८ लोकांचे ६७ लाख ६४ हजार ४३७ रुपयांचे नुकसान झाल्याचे महसूल कर्मचाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यावरून स्पष्ट झाले आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप कळले नाही.या आगीत सीताबाई पाटील, मनीषा वाघे, दया तबीब, हेमा पावसे, कलावती वाघे, मालती कुरुळकर, प्रभा पेडेकर, बाली खोपटकर, दीपक राठोड, समीर रहाटवळी, प्रशांत दुधवळकर, नितीन रघुवीर, किरण दोकुळकर, रामा काळपाटील, चंद्रकांत रघुवीर, अनंत पाटील, हरिश्चंद्र पाटील, लता चोगले, कलावती दोरकुळकर, अविनाश पटवा, सोमनाथ पावसे, नारायण रघुवीर, अजय पवार, रत्नाकर रघुवीर, जोखन गुप्ता, कैलास पावसे, गुलाब कालेकर या मच्छिमार बांधवांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाचे मासेमारी बंदर म्हणून हर्णै बंदराची ओळख आहे.
स्थानिकांनी आटोक्यात आणली आग
कोणत्याही प्रशासकीय मदतीची, अग्निशमन दलाची वाट न पाहता हर्णै पाजपंढरी गावातील मच्छिमार, बंदरातील स्थानिक मच्छिमार यांनी समुद्रातील पाणी, किनाऱ्यावरील पुळण (वाळू) टाकून आग आटोक्यात आणली. तब्बल तीन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ११ वाजता खेड नगरपरिषदेचा आगीचा बंब आला.