The crisis on the automobile sector will be resolved: Arvind Sawant | ऑटोमोबाईल क्षेत्रावरचे संकट दूर होणार : अरविंद सावंत

ऑटोमोबाईल क्षेत्रावरचे संकट दूर होणार : अरविंद सावंत

ठळक मुद्देऑटोमोबाईल क्षेत्रावरचे संकट दूर होणार : अरविंद सावंत पंतप्रधानांनी घेतली दखल; सहा महिन्यांपासून मंदीची लाट

सावंतवाडी : ऑटोमोबाईल क्षेत्रात जी मंदीची लाट आली आहे, ती मागील सहा महिन्यांपासून आहे. मात्र, आता याबाबत केंद्र सरकार गंभीर असून, मी सतत पाठपुरावा करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यामध्ये लक्ष घातले आहे. यातून या क्षेत्राला नक्की बाहेर काढू, असा विश्वास केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी व्यक्त केला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, अशोक दळवी, शब्बीर मणियार आदी उपस्थित होते.
मंत्री सावंत म्हणाले, ऑटोमोबाईल क्षेत्रात पडझड होण्यामागे अनेक कारणे आहेत. यात सध्या इलेक्ट्रॉनिक गाड्या मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत. तसेच गाड्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. त्याचा काहीसा फटका बसला आहे. त्यामुळे यावर मार्ग काढणे सुरू आहे. मी सतत याचा पाठपुरावा करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या समस्येवर गंभीर असून, तेही यावर मार्ग काढण्याबाबत तज्ज्ञांशी बोलत आहेत, असेही यावेळी मंत्री सावंत यांनी सांगितले.

वायमन गार्डनच्या जमिनी तसेच अन्य जमिनी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोकळ््या आहेत, हे मी लहानपणापासून ऐकत आहे. पण यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, असे मला वाटते. पण आता अवजड उद्योग खातेच अवजड झाले आहे, असे म्हणत माझ्या विभागाकडून जरी काही आणता आले नाही, तरी इतर विभागाच्या माध्यमातून तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. त्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकल्प आणताना प्रदूषणविरहित प्रकल्प आले पाहिजेत, असे मला वाटते. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करूनच प्रकल्प आणले जातील. मी पूरग्रस्तांना मदत वाटपासाठी जिल्ह्यात आलो आहे. आमच्या कामगार युनियन तसेच अन्य कार्यकर्त्यांमध्ये काम करीत आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगाराच्या विषयावर मी गंभीर असल्याचे यावेळी मंत्री सावंत यांनी सांगितले.

पूरग्रस्तांना देण्यासाठी आणलेल्या सामानाची माहिती केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिली. यावेळी रुपेश राऊळ, अशोक दळवी, शब्बीर मणियार, बाबू कुरतडकर उपस्थित होते.

Web Title: The crisis on the automobile sector will be resolved: Arvind Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.