CoronaVirus Lockdown : विशेष रेल्वेने कामगार रवाना, ३५० परप्रांतीय कर्नाटककडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 17:05 IST2020-05-16T17:03:42+5:302020-05-16T17:05:06+5:30
कुडाळ तालुक्यात असलेले कर्नाटक राज्यातील सुमारे ३५० परप्रांतीय कामगार श्रमिक एक्स्प्रेसने कर्नाटककडे रवाना झाले. अजूनही एक विशेष रेल्वे येत्या दोन दिवसांत सोडण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.

परप्रांतीय कामगारांना ओरोस स्टेशन येथून रेल्वेने रवाना करण्यात आले.
कुडाळ : कुडाळ तालुक्यात असलेले कर्नाटक राज्यातील सुमारे ३५० परप्रांतीय कामगार श्रमिक एक्स्प्रेसने कर्नाटककडे रवाना झाले. अजूनही एक विशेष रेल्वे येत्या दोन दिवसांत सोडण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगारासाठी कर्नाटक राज्यातील अनेक परप्रांतीय कामगार कुटुंबीयांसमवेत विविध गावातून येतात. कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे हे सर्व कामगार सिंधुदुर्ग जिल्ह्यातच अडकले होते. या सर्व कामगारांना प्रशासनाने त्यांच्या राज्यात जाण्यासाठी गुरुवारी ओरोस रेल्वेस्टेशन येथून विशेष श्रमिक एक्स्प्रेसची व्यवस्था केली होती.
या एक्स्प्रेसने ओरोस येथे जाण्यासाठी कुडाळ एसटी प्रशासनाने २० बसची व्यवस्था केली होती. दुपारी १.३० वाजल्यापासून प्रत्येक बसमध्ये २१ प्रवासी घेऊन या बसेस ओरोस रेल्वे स्टेशन येथे निघाल्या.
कुडाळ एसटी स्थानकात कुडाळचे तहसीलदार रवींद्र नाचणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. टी. हुलावळे, आगारप्रमुख सुजित डोंगरे, आरोग्य अधिकारी उपस्थित होते. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुडाळ एसटी डेपो येथे सर्व परप्रांतीय कामगारांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना एसटीत प्रवेश दिला.