CoronaVirus Lockdown : कॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रूपयांचा माफक दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:12 IST2020-05-21T14:10:16+5:302020-05-21T14:12:56+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवगड आंबा बागायतदारांनी स्वत:च्या मालाची स्वत:च विक्री करून विक्रीचा एक नवीन पायंडा रचून दलालाच्या विळख्यातून सुटकेचा श्वास घेतला. मात्र असे असताना आंबा कॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रुपये प्रतिकिलो माफक दराने आंबा खरेदी करून बागायतदारांची पूर्णत: पिळवणूक केली जात आहे.

CoronaVirus Lockdown : कॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रूपयांचा माफक दर
अयोध्याप्रसाद गावकर
देवगड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवगड आंबा बागायतदारांनी स्वत:च्या मालाची स्वत:च विक्री करून विक्रीचा एक नवीन पायंडा रचून दलालाच्या विळख्यातून सुटकेचा श्वास घेतला. मात्र असे असताना आंबा कॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रुपये प्रतिकिलो माफक दराने आंबा खरेदी करून बागायतदारांची पूर्णत: पिळवणूक केली जात आहे.
कोरोना विषाणूने देशामध्ये प्रवेश केल्यानंतर २२ मार्चपासून संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. सुरूवातीच्या लॉकडाऊनच्या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये बागायतदारांचे थोड्या फार प्रमाणात नुकसान झाले होते कारण वाशी मार्केट पूर्णत: बंद ठेवण्यात आले होते.
यानंतर राज्यभरातून व परराज्यातून देवगडमधील आंबा बागायतदारांना आंबा खरेदीसाठी थेट ग्राहक संपर्क करून आंब्यांची मागणी होऊ लागली. शेतकरी ते ग्राहक असे एक समीकरण बनले यातून बागायतदारांना दलाली नसल्याने फायदा होऊ लागला.
कोरोनाने देवगडमधील आंबा बागायतदारांना स्वत:चा माल स्वत:च विक्री करून स्वावलंबी बनविले. मात्र कॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रुपये प्रति किलो दराने आंबा खरेदी करून बागायतदारांची पिळवणूक केली जात आहे.
सुरूवातीला १० दिवसांपूर्वी देवगड तालुक्यातील कॅनिंग व्यवसाय सुरू झाला, त्यावेळी २० रुपये प्रति किलो कॅनिंग आंबा घेतला जात होता. कॅनिंगचा आंब्यांवर प्रक्रिया उद्योग करणारे कारखाने व घरगुती उपाय नसल्याचा फायदा घेऊन कॅनिंग कंपन्या बागायतदारांचा आंबा माफक दराने १४ रुपयेप्रमाणे खरेदी करीत आहेत.
लाखो व कोट्यवधी रुपये खर्च करून प्रत्येक तालुक्यामध्ये राज्य कृषी व पंचायत समिती कृषी विभागाची कार्यालये थाटली असताना माफक दरात कॅनिंग घेणाऱ्या कंपन्यांवर का कारवाई होत नाही असा सवाल बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.
आंबा कॅनिंगचा दर किमान ३0 रूपये प्रति किलो हवा
गतवर्षी २८ रुपये प्रति किलोने कॅनिंगचा आंबा याचवेळी घेतला जात होता. हा आंबा पल्प, बर्फी, ज्युस व आंब्यावर बनविले जाणारे पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जातो.
१ किलो आंब्यापासून आंबा पल्प बनविला तर तो ज्युस बाजारात प्रति १५० रुपये किलोने विकला जातो. आंब्यावर ज्युस बनविणाऱ्या प्रक्रियेला ४० रुपये प्रति किलो खर्च येतो व वाहतुकीचा खर्च प्रति बॉटलमागे ५ रुपये आहे. यामुळे १४ रुपये किलो आंबा, ४५ रुपये प्रक्रिया व वाहतूक खर्च एकूण निर्मितीमूल्य ५९ रुपये होते.
मात्र याच आंब्याची ज्युसची बॉटल १५० रुपये किंमतीने विक्री केली जाते. कॅनिंग कंपनी व प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रति बॉटल ८० रुपये फायदा मिळत आहे. तर उत्पादन घेणारा बागायतदाराच्या हातात मात्र उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी स्थिती होत आहे. किमान ३० रुपये प्रति किलो दराने आंबा कॅनिंग घेण्यात यावी, अशी मागणी बागायतदारांमधून केली जात आहे.