CoronaVirus Lockdown : आचऱ्यातील गर्दी आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 14:37 IST2020-04-20T14:36:11+5:302020-04-20T14:37:08+5:30
आचरा : आचरा तिठा ते आचरा बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांवर आचरा पोलिसांनी कारवाई ...

आचरा परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व इतर पोलीस उपस्थित होते.
आचरा : आचरा तिठा ते आचरा बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांवर आचरा पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, नियम मोडणाऱ्यांवर आचरा पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केल्यावर आचरा तिठा ते आचरा बाजारपेठमध्ये होणाऱ्या गर्दीला लगाम बसला आहे. यामुळे स्थानिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असतानाही दुचाकी घेऊन फिरणाऱ्यांना आचरा पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. गेल्या दोन दिवसांत ४४ जणांवर आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनासारख्या महाभयंकर संकटामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरुवातीला १४ एप्रिलपर्यंत असणारी संचारबंदी आता ३ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. मुंबई बांद्रा येथील घटनेमुळे पोलीस प्रशासनाने कडक धोरण अवलंबिले आहे.
शुक्रवारी खरेदी करण्याच्या निमित्ताने आचरा येथे आलेल्या दुचाकी वाहकांच्या कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली. यावेळी अपुरी कागदपत्रे असलेल्या दुचाकी चालकांवर मोटारवाहन अधिनियम कायद्याखाली केसेस दाखल करून सुमारे चार हजार दंड वसूल केला.
याबाबत आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी विनाकारण गरज नसतानाही कोणी फिरत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देत ग्रामस्थांनी घरातच थांबावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.