CoronaVirus Lockdown : गोंधळी समाजावर आली उपासमारीची वेळ, लॉकडाऊनमुळे फिरती झाली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:46 IST2020-05-26T15:45:16+5:302020-05-26T15:46:25+5:30
गोंधळी समाजाचे हातावरचे पोट असून ते भाड्याच्या घरात राहून मिळेल तिथे आपले वास्तव्य करीत आहेत. गोंधळी समाज हा गावोगावी फिरून भांडी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो.

कणकवली तालुका गोंधळी समाज संघटनेच्यावतीने उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांना शशिकांत इंगळे व इतर पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
तळेरे : गोंधळी समाजाचे हातावरचे पोट असून ते भाड्याच्या घरात राहून मिळेल तिथे आपले वास्तव्य करीत आहेत. गोंधळी समाज हा गावोगावी फिरून भांडी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो.
सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीमुळे गेले तीन महिने संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्याने समाजाला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यातूनच गेले तीन महिने फिरता व्यवसाय बंद झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
आपल्या स्तरावरून समाजासाठी ठोस धोरण आखून पुन्हा व्यवसाय होण्यासाठी योग्य ती मदत करावी, अशी मागणी कणकवली तालुका गोंधळी समाजाचे अध्यक्ष शशिकांत इंगळे यांनी सिंधुदुर्गजिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करून समाजाच्यावतीने लेखी निवेदनही सादर केले आहे.
जगण्याचा पर्याय म्हणून समाजातील काही लोक गेल्या पंधरा दिवसांपासून अत्यावशक वस्तू म्हणजेच भाजीपाला विकून आपले कुटुंब चालवीत होते. परंतु ह्या कोरोना या रोगामुळे खेड्यापाड्यांपासून गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांकडून फिरून भाजी विक्री करण्यास विरोध होत असल्याने समाजावर उपासमारीचे दिवस आले आहे.
आमच्या व्यवसायाला अत्यावश्यक सेवेमधील असणारे व्यवसाय म्हणून मान्यता द्यावी व उदारनिर्वाहाचे मार्गदर्शन करावे जेणेकरून गोंधळी समाजाचा पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. तरी योग्य विचार करून गोंधळी समाजाला न्याय द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी स्वीकारले. याप्रसंगी गोंधळी समाज तालुका अध्यक्ष शशिकांत इंगळे, सल्लागार बसवराज सूर्यवंशी, भैरीनाथ कांबळे, राजू इंगळे, माणिकराज वाघमारे हे उपस्थित होते.