CoronaVirus : कणकवली बाजारपेठेत पुन्हा एकदा उसळली गर्दी, पावसाळ्याची बेगमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 18:00 IST2020-06-04T17:58:46+5:302020-06-04T18:00:16+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील मंगळवारी होणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय तालुका व्यापारी संघ व प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या आठवडा बाजाराच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी व दुसऱ्या दिवशी म्हणजे विविध साहित्य खरेदी करण्याच्या उद्देशाने कणकवली बाजारपेठेत नागरिकांनी पुन्हा एकदा गर्दी केली होती.

कणकवली बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील मंगळवारी होणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय तालुका व्यापारी संघ व प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या आठवडा बाजाराच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी व दुसऱ्या दिवशी विविध साहित्य खरेदी करण्याच्या उद्देशाने कणकवली बाजारपेठेत नागरिकांनी पुन्हा एकदा गर्दी केली होती.
जीवनावश्यक वस्तूंसह पावसापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिक व इतर साहित्य खरेदी केले जात होते. कणकवली शहरात बुधवारी सकाळपासूनच नागरिकांनी विविध साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. बाजारपेठेतील अनेक दुकानेही उघडण्यात आली होती.
बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करणाºया ग्राहकांना कोरोना विषाणूची भीती नसल्याचे अनेकवेळा दिसून येत आहे. कारण प्रशासन विविध माध्यमातून कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन करीत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संधी मिळताच बाजारपेठेत नागरिकांकडून गर्दी होत आहे.
दरवर्षी मान्सून दाखल होत असतानाच शेतकरी तसेच इतर नागरिक पावसाळ्यात आवश्यक अशा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात करीत असतात. त्यामध्ये कांदे, मसाला अशा वस्तूंचा समावेश असतो. शेतकरी एकदा शेतीच्या कामात गुंतला की त्याला खरेदीसाठी कणकवलीसारख्या बाजारपेठेत भर पावसात येणे शक्य होत नाही.
यावर्षी मिरगाचा बाजार नाही!
कोकणात पावसाळ्याची बेगमी केली जाते. शेतीसाठी आवश्यक साहित्यही खरेदी केले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने आठवडा बाजार बंद केल्याने अनेक नागरिकांची गैरसोय झाली. त्यात मिरगाचा आठवडा बाजारही झाला नाही. त्यामुळे आठवड्यातल्या इतर दिवशी बाजारपेठेत हजेरी लावून खरेदी केली जात आहे.