कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाचे स्वॅब कलेक्शन सेंटर केले सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 16:20 IST2021-03-18T16:18:44+5:302021-03-18T16:20:42+5:30
Kankavli CoronaVirus Sindhudurg- कणकवली विश्रामगृहामध्ये गेले काही महिने सुरू असलेले कोरोना स्वॅब कलेक्शन सेंटर आता उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाचे स्वॅब कलेक्शन सेंटर केले सुरू
कणकवली : कणकवली विश्रामगृहामध्ये गेले काही महिने सुरू असलेले कोरोना स्वॅब कलेक्शन सेंटर आता उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे.
हे रुग्णालय उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमुळे नेहमीच गजबजलेले असते. कोरोनासदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्ती चाचणीसाठी तिथे येऊ शकतात. त्यामुळे याठिकाणी उपचार घेत असलेले रुग्ण व उपचारासाठी आलेले रुग्ण, रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी यांना जर कोविडचा संसर्ग झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
गेले काही महिने कोविडचा प्रादुर्भाव कमी होत आहे, असे वाटत असतानाच आता महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियमही कडक केले आहेत. तसेच त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. कणकवली विश्रामगृहावर सुरू असलेले स्वॅब कलेक्शन सेंटर आता उपजिल्हा रुग्णालयातच सुरू केले आहे. तिथे स्वॅब देण्यासाठी आलेले लोक रुग्णालय परिसरात फिरल्यास धोका निर्माण झाला आहे.
अन्य रूग्णांना कोरानाबाधा होण्याची शक्यता
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणीही आरोग्य कर्मचारी व त्या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांचा समावेश होता. अशास्थितीत या शिबिराच्या ठिकाणापासून काही अंतरावर कोरोनासदृश्य व्यक्तिंचा स्वॅब कलेक्शन कक्ष तयार करण्यात आलेला आहे. यामुळे या भागातील आरोग्य कर्मचारी व अन्य रुग्णांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे.