corona virus : कुडाळ बाजारपेठ २३ सप्टेंबरपर्यंत आठ दिवस बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:46 IST2020-09-14T17:44:58+5:302020-09-14T17:46:41+5:30
कुडाळ शहर बाजारपेठ बुधवार १६ ते २३ सप्टेंबरपर्यंत सलग आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

कुडाळ येथील मारुती मंदिरातील धर्मशाळेत झालेल्या व्यापारी संघटनेच्या बैठकीत व्यापारी बांधव सहभागी झाले होते.
कुडाळ : कुडाळ शहर बाजारपेठ बुधवार १६ ते २३ सप्टेंबरपर्यंत सलग आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
कुडाळ शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे यांनी दिली. याबाबत नागरिकांनी, ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, या अनुषंगाने जिल्हा बंदची हाक देत जिल्हावासीयांनी यात सहभागी व्हावे, असे सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून कुडाळ शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाने शहरातील प्रमुख बाजारपेठेतही शिरकाव केला आहे. त्यामुळे शहरातील ही साखळी तोडण्यासाठी शहर बंद ठेवावे असा सूर उमटू लागला. सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा झाली. त्यानंतर व्यापारी संघटनेने बैठक घेऊन कुडाळ शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
येथील मारुती मंदिराच्या धर्मशाळेत व्यापारी संघटनेची बैठक झाली. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे, नगराध्यक्ष ओंकार तेली, भाऊ शिरसाट, विद्याप्रसाद बांदेकर, प्रसाद धडाम, संदेश पडते, अवधूत शिरसाट, अनुप तेली, अभय शिरसाट, राजेश महाडेश्वर, सुनील घुर्ये, विनायक राणे, राकेश कांदे, सतीश वर्दम, आबा धडाम, गणेश भोगटे, सुरेश चिंदरकर, सुनील बांदेकर, मिलिंद देसाई, अतुल सामंत, जालम सिंह पुरोहित, पी. डी. शिरसाट, शिल्पा घुर्ये, दीपक भोगटे आदी उपस्थित होते.
कुडाळ शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही साखळी तोडण्यासाठी एकजुटीने आपण हा बंद यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले. मागील लॉकडाऊनच्या काळात शहरातील एकजूट कोलमडल्याचे चित्र दिसले. त्यामुळे एकसंधता मोडली. आता यापुढे कुडाळची एकजूट दाखविण्यात यावी असा निर्धार करण्यात आला.