corona virus-आचरा रामनवमी उत्सव मर्यादित स्वरुपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 16:11 IST2020-03-19T16:08:32+5:302020-03-19T16:11:26+5:30
आचरा येथील संस्थानकालीन प्रसिद्ध देवस्थान श्री देव रामेश्वराच्या मंदिरात २४ मार्च गुढीपाडव्यापासून ते लळीत असा ११ दिवस साजरा होणारा रामनवमी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरुपाचा करण्याचा निर्णय श्री देव रामेश्वर संस्थानने घेतला आहे.

corona virus-आचरा रामनवमी उत्सव मर्यादित स्वरुपात
आचरा : आचरा येथील संस्थानकालीन प्रसिद्ध देवस्थान श्री देव रामेश्वराच्या मंदिरात २४ मार्च गुढीपाडव्यापासून ते लळीत असा ११ दिवस साजरा होणारा रामनवमी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरुपाचा करण्याचा निर्णय श्री देव रामेश्वर संस्थानने घेतला आहे.
उत्सव काळात फक्त मंदिरात पारंपरिक साजरे होणारे दैविक विधी व कार्यक्रम होणार असून यावेळी संबंधित व्यक्ती हजर राहणार आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी तसेच बाहेरगावच्या भक्तगणांनी मंदिराकडे न येण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.
कोरोना नावाची महामारी दिवसागणित पसरत असल्याने देशात आणीबाणीजन्य परिस्थिती उद्भवली आहे. याबाबत शासनाने काढलेले अध्यादेश पाळणे क्रमप्राप्त असल्याने तसेच मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येणार असल्याने देवस्थान कमिटी, बारापाच मानकरी व संबंधितांची तातडीची बैठक रविवारी घेतली.
या बैठकीत चर्चा करून श्रींचा उत्सव मर्यादित स्वरुपाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीत हा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे ठरविण्यात आले. या कालावधीत स्थानिक ग्रामस्थ तसेच भाविकांनी मंदिराच्या आवारात गर्दी करू नये. उत्सवासाठी एखाद्या घरात बाहेरील पाहुणा आल्यास त्याची तपासणी करू न दक्षता घ्यावी.
या काळात परिसर स्वच्छ ठेवावा व शिस्तीचे पालन करणे हा गावचा आदर्श असल्याने सर्वांनी निर्णयाचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
महाप्रसादाचा कार्यक्रम स्थगित
प्रतिवर्षी सुमारे १५ हजार भाविकांना रामनवमी दिवशी महाप्रसाद दिला जातो. हा कार्यक्रम गावकरी मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येऊन करतात. आदल्या दिवशी शेकडो महिला तसेच पुरुष एकत्र येतात.
या दोन्ही दिवशी भाविकांची मोठी गर्दी होते. म्हणूनच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून रामनवमीला होणारा महाप्रसादाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.