corona cases in Sindhudurg : सहव्याधीग्रस्त ६४ वर्षीय व्यापाऱ्याची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 18:29 IST2021-06-03T18:20:28+5:302021-06-03T18:29:45+5:30
corona cases in Sindhudurg : मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखी सहव्याधीनेग्रस्त! या व्याधींना मारण्यासाठी दररोज ११ गोळ्या घ्याव्या लागत होत्या. अशातच कोरोनाची लागण झाली. मोठ्या प्रमाणावर ताप आणि डायरिया, यामुळे प्रकृती नाजूक झाली होती; पण जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्यपूर्ण उपचारामुळे कोरोनावर मात करू शकलो, अशा भावना व्यक्त केल्या आहेत मालवण येथील ६४ वर्षीय किराणा व्यापाऱ्यांनी.

corona cases in Sindhudurg : सहव्याधीग्रस्त ६४ वर्षीय व्यापाऱ्याची कोरोनावर मात
सिंधुदुर्ग : मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखी सहव्याधीनेग्रस्त! या व्याधींना मारण्यासाठी दररोज ११ गोळ्या घ्याव्या लागत होत्या. अशातच कोरोनाची लागण झाली. मोठ्या प्रमाणावर ताप आणि डायरिया, यामुळे प्रकृती नाजूक झाली होती; पण जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्यपूर्ण उपचारामुळे कोरोनावर मात करू शकलो, अशा भावना व्यक्त केल्या आहेत मालवण येथील ६४ वर्षीय किराणा व्यापाऱ्यांनी.
कोरोनाचे निदान झाल्यानंतर सुरुवातीस त्यांना २ दिवस गृहविलगीकरणात ठेवण्यात आले होते. पण, त्यांची प्रकृती बिघडली, डायरिया थांबत नव्हता. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असल्यामुळे त्यांना अधिक लक्षपूर्वक निरीक्षणाखाली ठेवून औषधोपचारांची गरज होती. तसेच इतर आजारांमुळे त्यांचे मानसिक मनोबलही कमी झाले होते. या सर्वांचा विचार करून त्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देण्यात आले. त्यांच्या नियमित औषधांसोबतच कोरोनावरील उपचारही सुरू करण्यात आले.
वेळोवेळी रक्त तपासणीसह इतर तपासण्या करून औषधांमध्ये बदल करण्याविषयी निर्णय घेतले जात होते. तसेच त्यांचे मानसिक समुपदेशनही करण्यात येत होते. त्याचबरोबर त्यांच्या आहाराचे नियोजनही तितकेच महत्त्वाचे होते. विशेष म्हणजे त्यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या कुटुंबीयांना रोजच्या रोज दूरध्वनीवरून माहिती दिली जात होती.
जिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावेत
इतर आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी घरीच उपचार न घेता रुग्णालयामध्ये जाऊनच उपचार घ्यावेत. जिल्हा रुग्णालयामध्ये उत्तम प्रकारचे उपचार केले जात आहेत. डॉक्टर्स व नर्स घरच्या प्रमाणे रुग्णांची काळजी घेत आहेत. प्रत्येक रुग्णाला त्यांच्या प्रकृतीप्रमाणे उपचार केले जात आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी इतर आजार असणाऱ्यांनी घरी उपचार न घेता जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आले.
दुसरा जन्म मिळाला
कोरोनावर मात केल्यानंतर घरी परतल्यावर या सर्वाविषयी सांगताना त्यांचा मुलगा म्हणाला, योग्य औषधोपचार, मानसिक समुपदेशन आणि आहाराचे योग्य नियोजन यामुळेच आमच्या वडिलांना आज दुसरा जन्म मिळाला आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. सरकारी रुग्णालयात जाण्याची आमची ही पहिलीच वेळ होती. तिथे कसे उपचार होतील, व्यवस्था कशी असेल याविषयी मनात शंका होती. रुग्णालयातील सोयींबाबत आम्हाला फारशी अपेक्षा नव्हती. पण, ज्या प्रकारच्या सुविधा, जेवण आमच्या रुग्णाला तिथे मिळाले ते पाहून आमचा ग्रह पूर्ण पालटला.