कणकवली: समग्र शिक्षा सेवेत कायम करण्याच्या प्रमुख मागणीसाठी समग्र शिक्षा संघर्ष समिती आता आक्रमक झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी हे ३ मार्चपासून मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा इशारा लेखी निवेदनाव्दारे प्रशासनाला दिला आहे.समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यच्यावतीने समग्र शिक्षामधील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्याचे ३ मार्चपासून आझाद मैदान मुंबई येथे सेवेत कायम करण्याबाबत बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे लेखी निवेदनाव्दारे प्रशासनाला संघटनेने कळवले आहे.महाराष्ट्र राज्य समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचारी हे मागील १८ ते २० वर्षापासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. शासनाने शासनाच्या विविध विभागातील कंत्राटी रोजंदारी व ठेका तत्वावरिल कर्मचारी यांना सेवेत कायम केले आहे.त्याचप्रमाणे समग्र शिक्षा या योजनेतील समावेशित शिक्षण या उपक्रमातील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना शासनाने मागील तीन चार महिन्यापूर्वी शासन सेवेत कायम केले आहे. उर्वरित कर्मचारी यांनी देखील आजपर्यंत शासनाकडे सेवेत कायम करण्याबाबत वारंवार अर्ज, विनंत्या व निवेदने सादर केलेली आहेत. त्यामुळे सेवा कायम करण्याकरिता शासनाने अभ्यास समिती सुध्दा स्थापना करून या समितीचा ६ महिने कालावधी पुर्ण झाला आहे.त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय दूर करुन नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने व मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना सेवेत कायम करावे,या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.असे संघटनेच्या वतीने प्रशासनाला कळविण्यात आले आहे.तसेच कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आजपासून काम बंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:46 IST