ब्लड बँक मोबाईल व्हॅनची संकल्पना

By Admin | Updated: October 12, 2014 01:00 IST2014-10-12T00:55:55+5:302014-10-12T01:00:36+5:30

रूग्णसेवा करणार अत्याधुनिक : सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार

Concept of Blood Bank Mobile Van | ब्लड बँक मोबाईल व्हॅनची संकल्पना

ब्लड बँक मोबाईल व्हॅनची संकल्पना

४आपल्याला एवढ्या लहान वयात आमदारकीचे तिकीट मिळाले. याबाबत तुम्ही काय सांगाल?
- मी जरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा सुपूत्र असलो तरी मला जी संधी मिळाली आहे, त्यामागे गेल्या ९ वर्षात आपण राज्यात स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून केलेल्या विविध यशस्वी उपक्रमांची पोचपावती आहे, असे मला वाटते. तसेच याच कालावधीत सिंधुदुर्गात काम करत असताना आपल्याला कार्यकर्त्यांकडून खूप काही शिकता आले. एखादी निवडणूक लढवायची म्हणजे नेमके काय करावे लागते. किती तास काम करावे लागते याची जाणिव आपल्याला लहानपणापासूनच आहे. कारण राणेसाहेबांच्या गेल्या पाच निवडणुकांमध्ये ते करत असलेले काम आणि मेहनत आपण जवळून अनुभवली आहे. मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.
४आमदार होण्याअगोदरच आपण आगामी व्हिजन मांडता ही एक वेगळी संकल्पना आहे. त्यामागची नेमकी भावना काय?
- खरे तर प्रत्येक लोकप्रतिनिधीने निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी आपण मतदारांसाठी आगामी पाच वर्षात काय करणार आहोत, ही संकल्पना त्यांच्यासमोर मांडली पाहिजे. नुसती संकल्पना मांडून चालणार नाही तर दर महिन्याला आपण मांडलेल्या संकल्पनेप्रमाणे काम होते की नाही याची चाचपणी केली पाहिजे. आमदारकी ही केवळ मिरविण्यासाठी असता कामा नये. ज्यावेळी लोक आपल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून विश्वास टाकणार तो विश्वास सार्थकी लावण्यासाठी आपण सतत कार्यरत राहिले पाहिजे. त्यामुळे आपण पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलो आहोत. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि माझ्या कामाची दिशा ठरवून त्यात सर्व लोकांना सामावून घेण्यासाठी आपण कणकवली, देवगड आणि वैभववाडी या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांचे व्हिजन डॉक्युमेंटरी मांडली असून त्याला सर्व स्तरातील लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
४सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला, मात्र येथे काहीच झाले नाही. येथे पर्यटनवाढीसाठी तुम्ही कोणती भूमिका घेणार आहात ?
- आपल्या एवढी निसर्गसृष्टी, स्वच्छ सागर किनारा परदेशातसुद्धा शोधून सापडणार नाही. मात्र, पर्यटन जिल्हा जाहीर होवून पर्यटनासाठी पायाभूत सुविधा येथे उपलब्ध न झाल्यामुळे जगभरातून पर्यटक येथे येताना विचार करतो. आलेला पर्यटक राहण्यासाठी गोव्यात जातो. कारण चांगली हॉटेल्स आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुखसुविधा आपल्याकडे नाहीत. आगामी काळात पर्यटनासाठी वातावरण निर्मिती करण्याची आपली प्रमुख भूमिका असेल. त्याचहेतूने आपण सिंधुदुर्ग गाईडची संकल्पना कार्यरत केली असून त्यातून गेली काही वर्षे हजारो पर्यटक सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. जिल्ह्यात ठराविक ठिकाणी आपण टुरिस्ट माहिती केंद्रांचीही उभारणी भविष्यात करणार आहे. पर्यटनक्षेत्राला चालना मिळण्यासाठी सर्व पद्धतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच कोकणसाठी स्वतंत्र पर्यटन महामंडळ होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. कारण या क्षेत्रातून हजारोंना रोजगार मिळेल. इथल्या इथे काम मिळाल्याने कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांच्या संख्येतही घट होईल आणि सुशिक्षित बेरोजगारांनीही संधी निर्माण होईल.
४आपण सध्या मतदारसंघात लोकांशी थेट संवाद साधत आहात. त्यामागची कारणे कोणती?
- मला या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे आहे, तर मला मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेच पाहिजे. लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या थेट जाणून घेतल्यावरच आपल्याला योग्य काम करता येईल. ही या मागची प्रमुख भावना आहे. लोकांमध्ये थेट गेल्यामुळे अनेक गोष्टी आपल्यासमोर आल्या. त्यातील काही गोष्टी चांगल्या आहेत. तर काही गोष्टींमुळे मला पुढे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अनेक विषयांवर सखोल अभ्यास करता येणार आहे. मी माझा मतदार आणि स्वत:मध्ये कुठलीही दरी ठेवणार नाही. माझ्या मतदारांना मी ‘हक्काचा माणूस’ म्हणून केव्हाही उपलब्ध होवू शकण्यासाठीच आपण थेट लोकांपर्यंत जावून ज्यांना आवश्यक असेल त्यांना आपला मोबाईल नंबरही देत आहे.
४जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यांच्यासाठी आपले काय व्हिजन आहे?
- आपण स्वाभिमान संघटनेच्यावतीने ४ मार्च २0१२ रोजी कुडाळ येथे कोकण पट्ट्यातील तरूणांना नोकरीची दुर्मीळ संधी मिळवून देणारा रोजगार मेळावा घेतला होता. यात १0 हजार तरूणांना विविध क्षेत्रात नोकऱ्या देण्यात आल्या. तसेच संघटनेच्या माध्यमातून मुंबईत नोकरी तुमच्या दारी या रोजगारविषयक अभिनव उपक्रमाची सुरूवात केली. स्वाभिमान संघटनेची ही नोकरी एक्सप्रेस मोबाईल व्हॅन राज्यातील शहरे व खेड्यापाड्यात जावून युवक व युवतींना रोजगार मिळवून देईल. सिंधुदुर्ग पर्यटनाच्या कक्षेला नवा आयाम देत सिंधुदुर्गात पर्यटकांना प्रशिक्षित गाईड मिळवून देण्याची तसेच तेथील स्थानिकांना रोजगार मिळवून देत आपल्या पायांवर उभे राहण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठीच ‘सिंधुदुर्ग गाईड’ ही संकल्पना आपण साकारली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निसर्गसौंदर्य आणि येथील संस्कृती देशी-विदेशी पर्यटकांना जवळून अनुभवता यावी, या उद्देशाने सिंधुुदुर्ग गाईडच्यावतीने सिंधुदुर्ग गाईड डॉट कॉम हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका विश्वाला सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ‘महाराष्ट्र कलानिधी’ या योजनेची मुहूर्तमेढ रोवली. उद्योजक, कलाक्षेत्र आणि प्रेक्षकवर्ग या त्रिमितीला जोडणाऱ्या महाराष्ट्र कलानिधीचा शुभारंभ झाला. याच महाराष्ट्र कलानिधी अंतर्गत मालवणात फिल्मसिटी उभारण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत. अशा अनेक गोष्टींवर आगामी दहा वर्षात आपल्याला सिंधुदुर्ग जिल्हा खूप पुढे न्यावयाचा आहे. त्यादृष्टीने लोकांनी आपल्यावर विश्वास टाकावा, असे आवाहन नीतेश राणे यांनी यावेळी केले.
- शब्दांकन : महेश सरनाईक

Web Title: Concept of Blood Bank Mobile Van

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.