कृष्णधवल छायाचित्रांच्या रंगीत स्मृती
By Admin | Updated: August 18, 2016 23:34 IST2016-08-18T23:34:15+5:302016-08-18T23:34:21+5:30
जुने तंत्रज्ञान : रत्नागिरीतील पहिले फोटोग्राफर प्रभाकर काळे यांचा उल्लेख-- फोटोग्राफी दिन विशेष
कृष्णधवल छायाचित्रांच्या रंगीत स्मृती
विहार तेंडुलकर / संदेश पवार ल्ल रत्नागिरी
हातात मोबाईल असेल तर आताच्या जगात पटापट सेल्फी काढता येतात. पण एक जमाना असा होता, ज्यावेळी रत्नागिरी हे एक गाव होतं, त्याकाळातही येथे फोटोग्राफी अर्थात छायाचित्रण सुरु होते. त्यावेळी एकेक फोटो काढून तो डेव्हलप करेपर्यंत काही तास लागायचे. त्यामुळे फोटो काढल्यानंतर काही दिवसांनी फोटोची प्रत मिळत होती. आताच्या काळात फोटोग्राफी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले असले तरी जुन्या तंत्रज्ञानाची ओळख अजूनही रत्नागिरीला आहे, ती जुन्याजाणत्या फोटोग्राफर्सनी जपून ठेवलेल्या भूतकाळातील आठवणींमुळे!
रत्नागिरीतील प्रभाकर महादेव काळे या तरुणाने पुण्यातील एका स्टुडिओत चिकाटीने काम करत सहा महिने राहून फोटोग्राफीचे ज्ञान मिळवले. बोर्ड रंगवण्याचे काम करून मिळवलेल्या पैशातून त्यांनी कॅमेरा खरेदी केला आणि १९२९मध्ये रत्नागिरीत फोटोग्राफी या नव्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी पी. एम. काळे या नावाने केली. तेच रत्नागिरीतील पहिले फोटोग्राफर होते.
याबाबत त्यांचे चिरंजीव शरद काळे यांनी माहिती दिली. काळे यांचे कौशल्य व कलात्मकता पाहून मुंबईतील फोटोग्राफीसाठी आवश्यक साहित्य पुरवणाऱ्या आघाडीच्या विविध कंपन्यांनी त्यांना रत्नागिरीतील फोटोग्राफी सामानाचे अधिकृत विक्रेते म्हणून मान्यता दिली. त्यावेळी फोटोग्राफीचे सर्व साहित्य म्हणजे कॅमेरा, रोल फिल्म्स, पेपर, रसायने आदी सर्व साहित्य इंग्लड, अमेरिका, जर्मनी, जपान येथून येत असे.
सन १९६०मध्ये काळे यांनी सुभाष रोड येथे आपला स्टुडिओ अनिल फोटो स्टुडिओ नावाने सुरु केला. रत्नागिरीत हरिश्चंद्र साळवी, बालाजी लक्ष्मण कदम हेही त्याकाळात फोटोग्राफर्स म्हणून परिचित होते.
१२० नंबरचा कॅमेरा...
जुन्या फोटोग्राफीबद्दल बोलताना शरद काळे यांनी सांगितले की, सुरुवातीला प्लेट कॅमेरे असत व एकावेळी एकच फोटो घेता येत असे. नंतर १२० नंबरचे कॅमेरे आल्यावर एकावेळी १२ फोटो घेता येऊ लागले. ३३ एमएमचे कॅमेरे आल्यावर फोटोग्राफी आणखी सुलभ झाली. विजेचा वापर होण्यापूर्वी फोटो घेणे, त्यांचे प्रिंटिंग करणे, सूर्यप्रकाशावर अवलंबून राहात असे.
पूर्वीची फोटोग्राफी
रत्नागिरीत १९६५ साली हरिश्चंद्र साळवी यांनी स्मृती फोटो स्टुडिओ या नावाने फोटो स्टुडिओ सुरु केला. त्याकाळी एखाद्या व्यक्तीचा पहिला फोटो निघायचा, तोच मुळी दहावीच्या रिसिटसाठी! १९६५-७०च्या दरम्यान झालेल्या चक्रीवादळाच्या नुकसानाचे फोटो साळवी यांनीच काढले होते. त्याकाळात फॅक्सची सुविधा नव्हती. त्यामुळे कोणताही रिपोर्ट हा फोटो काढूनच पाठवावा लागे. हे काम साळवी करत असत. साळवी यांनी रत्नागिरीतील गोगटे - जोगळेकर कॉलेजच्या मैदानावर झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संपूर्ण सभामंडपाचा एकत्रित फोटो ‘मिनॉल्ट’च्या फिशाय लेन्समधून काढला होता. साळवी यांनी अनेक महनीय व्यक्तींचेही फोटो काढले आहेत. सध्या त्यांचा स्टुडिओ त्यांचे चिरंजीव अजित साळवी हे सांभाळत आहेत.
ब्रिटिशांचे प्रोत्साहन
पी. एस. काळे यांना त्यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिल्याने त्यांचा व्यवसाय बहरला. त्यामुळे संपूर्ण रत्नागिरी तालुक्यात काळे हे फोटोग्राफी करण्यासाठी जात असत. त्यांच्या फोटोग्राफीला दादही मिळत होती.
शेठ यांचेही मोठे योगदान
नारायण लालजी शेठ यांच्या रुपाने रत्नागिरीला सर्वांत मोठा व्यावसायिक फोटोग्राफर लाभला. त्यांनी १९५१ साली चिपळुणात छाया फोटो स्टुडिओची स्थापना केली आणि त्यानंतर रत्नागिरीत! चिपळुणात तर त्यांचे तीन स्टुडिओ आहेत.