CoronaVirus Lockdown : घंटागाडी कर्मचाऱ्याची चक्क नोटांची माळ घालून ओवाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 21:23 IST2020-04-11T21:17:02+5:302020-04-11T21:23:17+5:30
सावंतवाडीकरांकडून गुरुवारी वेगळीच अनुभूती पहायला मिळाली. एरव्ही घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची जबाबदारी असलेल्या येथील पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे चक्क नोटांची माळ घालून, तसेच ओवाळून येथील सबनीसवाडा भागातील नागरिकांनी आभार मानले.

CoronaVirus Lockdown : घंटागाडी कर्मचाऱ्याची चक्क नोटांची माळ घालून ओवाळणी
सावंतवाडी : सावंतवाडीकरांकडून गुरुवारी वेगळीच अनुभूती पहायला मिळाली. एरव्ही घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची जबाबदारी असलेल्या येथील पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे चक्क नोटांची माळ घालून, तसेच ओवाळून येथील सबनीसवाडा भागातील नागरिकांनी आभार मानले. तसेच यापुढेसुद्धा अशाच पध्दतीने सेवा बजवावी, अशी मागणी त्यांनी या कर्मचाऱ्यांकडे केली.
लोकांचे प्रेम पाहून त्या घंटागाडी कर्मचाऱ्यांलासुध्दा एक सुखद धक्का बसला. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून घरात रहा, असे आवाहन करण्यात येते. मात्र सावंतवाडी पालिकेचे स्वच्छता करणारे कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येथील सबनीसवाडा भागात राहणाऱ्या नागरिकांनी एक अनोखी शक्कल लढविली. घरोघरी जाऊन पैसे जमा केले. त्यातून त्या कर्मचाऱ्यांला आवश्यक असलेले नवे कपडे, मास्क आदी साहीत्य तर दिलेच शिवाय एवढ्यावरच न थांबता त्याला चक्क नोटांची माळ घालून ओवाळणी करण्यात आली.
यावेळी नागरिकांचे अशा प्रकारचे अनोखे प्रेम पाहून त्या कर्मचाºयाला सुखद धक्का बसला. यावेळी प्रमोद वाडकर, अभय माईणकर, अतुल माईणकर, वासुदेव शितोळे, पुष्पक माठेकर, प्रणाली वाडकर, प्रतिज्ञा वाडकर, पौर्णिमा माठेकर, अपर्णा शितोळे, विशाल शितोळे आदी उपस्थित होते.