सावंतवाडी मतदारसंघावर दावा
By Admin | Updated: July 16, 2014 00:26 IST2014-07-16T00:17:17+5:302014-07-16T00:26:35+5:30
अतुल काळसेकर : भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत मागणी करणार

सावंतवाडी मतदारसंघावर दावा
कणकवली : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची पक्ष संघटना सरस आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपाला मिळावा अशी मागणी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली.
येथील संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काळसेकर म्हणाले, १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुंबई येथील वसंत स्मृती सभागृहात प्रदेश भाजपा कोअर टीम व सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या कोअर टीमची एकत्रित बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आमदार पंकजा मुंडे, सुधीर मनगुंटीवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. यावेळी माझ्यासह जिल्ह्याच्या कोअर कमिटीचे सदस्य आमदार प्रमोद जठार, प्रमोद रावराणे, जयदेव कदम, चारुदत्त देसाई, राजन म्हापसेकर, राजू राऊळ, राजश्री धुमाळे, अॅड. अजित गोगटे, मिलिंद केळुसकर उपस्थित राहून भाजपा नेत्यांशी चर्चा करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती देण्यात येणार आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी गेली साडेतीन वर्षे भाजपाकडून करण्यात येत आहे. त्याची माहितीही या आढावा बैठकीत देण्यात येणार आहे. बदललेल्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले आहेत. तसेच एक कार्यकर्ता म्हणून संघटनेत आपण काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याबद्दल त्यांचे स्वागत करतो. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी निवडणूक लढविलेले शिवराम दळवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे तर शिवसेनेच्या तत्कालीन दोन जिल्हाप्रमुखांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेली साडेतीन वर्षे शिवसेनेत अस्थिर स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी भाजपाने या मतदारसंघात टेकीने काम सुरु केले होते. बुथ एजंट नेमण्याबरोबरच संघटना बांधणीही करण्यात आली आहे. दोडामार्ग पंचायत समिती भाजपाकडे असून सभापतीही भाजपाचेच आहेत. बांदा पंचायत समिती मतदारसंघाबरोबरच सरपंचही आमचाच आहे. आजूबाजूच्या ग्रामपंचायतींही भाजपाच्याच ताब्यात असून वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आमचा पक्ष आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराने निवडणूक लढवावी अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. या मतदारसंघातील पक्ष संघटनेच्या अस्तित्वाचा प्रश्न या निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण झाला आहे.
केसरकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने स्थानिक शिवसैनिक नाराज आहेत. याठिकाणी पक्षातीलच स्थानिक उमेदवार द्यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे या नाराजीचाही फटका विधानसभा निवडणुकीत बसू शकतो याकडे पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधणार असल्याचे काळसेकर म्हणाले. (वार्ताहर)