Cyclone Sindhudurg-चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 06:48 PM2021-05-15T18:48:14+5:302021-05-15T18:52:36+5:30

Cyclone Sindhudurg-अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रिवादळ जिल्ह्याच्या समुद्रात 16 मे रोजी दाखल होत आहे. रविवारी पहाटे 4.00 वा. जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणारे हे वादळ दुपारी 2.00 वा. जिल्ह्याची सीमा ओलांडून पुढे जाणार आहे. त्यामुळे पहाटे 4.00 ते दुपारी 2.00 या कालावधीमध्ये नागरिकांनी अधिक दक्ष रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी देले आहे.

Citizens should take appropriate precautions against the backdrop of cyclones | Cyclone Sindhudurg-चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी

Cyclone Sindhudurg-चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी

Next
ठळक मुद्देचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी16 मे रोजी पहाटे 4.00 ते दुपारी 2.00 नागरिकांनी अधिक दक्ष रहावे- जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्ग  - अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रिवादळ जिल्ह्याच्या समुद्रात 16 मे रोजी दाखल होत आहे. रविवारी पहाटे 4.00 वा. जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणारे हे वादळ दुपारी 2.00 वा. जिल्ह्याची सीमा ओलांडून पुढे जाणार आहे. त्यामुळे पहाटे 4.00 ते दुपारी 2.00 या कालावधीमध्ये नागरिकांनी अधिक दक्ष रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी देले आहे.

अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या तौत्के या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिनांक 15 ते 16 मे 2021 या दिवशी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी वर्तवली आहे. तसेच दिनांक 15 मे 2021 रोजी या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर ताशी 50 ते 70 कि.मी. वेगाने तर दि. 16 मे 2021 रोजी ताशी 60 ते 80 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच समुद्र खवळलेला राहणार आहे. या कालावधीत मच्छिमारांनी तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हे चक्रीवादळ दिनांक 16 मे रोजी अंदाजे पहाटे 4.00 वा. गोव्याची सीमा ओलांडून सिंधुदुर्गच्या समुद्रात येणार असून दुपारी 2.00 च्या दरम्यान सिंधुदुर्गची सीमा ओलांडून पुढे जाईल. त्यामुळे 16 मे 2021 रोजी पहाटे 4.00 ते दुपारी 2.00 पर्यंत जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

चक्रीवादळ कालावधीत विजा चमकणार असल्याने या कालावधीत पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. विजा चमकत असताना एखाद्या मोकळया परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.

चक्रीवादळ कालावधीत वाहणारा सोसाटयाचा वारा व मुसळधारा पर्जन्यवृष्टी लक्षात घेवून नागरिकांनी पुढीलप्रमाणे सावधगिरी बाळगावी. मुसळधार पावसात व सोसाट्याच्या वाऱ्यात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस व वारा थांबेपर्यत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.

अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत व सोसाट्याचा वारा वाहत असताना सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करु नका.  पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तुंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.

मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्र कक्ष-02362-228847 किंवा टोल फ्री - 1077 ला संपर्क करावा, तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग तालुक्यासाठी - 02363-256518, सावंतवाडी तालुक्यासाठी - 02363-272028, वेंगुर्ला तालुक्यासाठी - 02366-262053, कुडाळ तालुक्यासाठी - 02362-222525, मालवाण तालुक्यासाठी - 02365252045,कणकवली तालुक्यासाठी - 02367-232025, देवगड तालुक्यासाठी- 02364- 262204, वैभवाडी तालुक्यासाठी - 02367-237239, या दूरध्वनी क्रमांवर संपर्क करावा. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in  या संकेतस्थळावरुन घ्यावी. तसेच टीव्ही, रेडिओ इ. वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवा.

आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित ठाकणी हलवा, प्रशासनाकडून स्थलांतराची सूचना मिळल्यास त्याचे पालन करा. घर सोडून स्थलांतर करावे लागल्यास गॅस, वीज, पाणी कनेक्शन बंद करून घर सोडा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कोणत्याही बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करुन घ्यावी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष 02362 - 228847 किंवा टोल फ्री क्रमांक - 1077 या क्रमांवर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी जाण्याचे टाळा. हवामान विभागाकडून, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करुन जीवित व मालमत्तेची काळजी घ्यवी. असे आवाहन के.मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

Web Title: Citizens should take appropriate precautions against the backdrop of cyclones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app