सावंतवाडी : काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून काल, शुक्रवारी सकल हिंदू समाज व हिंदू परिषद यांच्यावतीने सावंतवाडी गांधी चौक येथे निषेध व्यक्त करण्यात आला होता. यावेळी गांधी चौक परिसरात पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर टाकण्यात आला होता.
शनिवारी सकाळी तो पाकिस्तानचा झेंडा एका भाजी विक्रेत्याने रस्त्यावरून उचलून आपल्या दुकानात नेऊन ठेवला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. ही घटना नागरिकांना लक्षात येताच काही नागरिकांनी एकत्र येत या भाजी विक्रेत्याला जाब विचारत चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत पुढील कार्यवाही पोलिस प्रशासन करत आहे.
तसेच सावंतवाडी येथील भाजी मंडईमध्ये असेच काही विक्रेते ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांना दमदाटी आणि दादागिरी करत असल्याच्या तक्रारी येथील महिलांनी केल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी या प्रकरणात नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून अनधिकृतपणे बसणाऱ्यांना नगरपरिषदेने येथून उठवावे, अशी मागणी केली.