CoronaVirus Lockdown : चिरेखाणीवरील कामगारांच्या पेटल्या चुली, शिवाजी कोळी यांनी घेतला पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 16:34 IST2020-04-09T16:32:34+5:302020-04-09T16:34:14+5:30
आम्ही चिरेखाणीवर रोजंदारीवर काम करतो.. धान्यसाठा संपला आहे...झोपडीत आता अन्नाचा कणसुद्धा नाही... एकतर आम्हांला धान्य द्या, नाहीतर गावी जाण्याची परवानगी द्याह्ण अशी कैफियत असरोंडी येथील एका चिरेखाणीवर काम करणाऱ्या दहा कामगारांनी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे मांडली.

उपाशी असलेल्या कामगारांना कणकवली पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
कणकवली : आम्ही चिरेखाणीवर रोजंदारीवर काम करतो.. धान्यसाठा संपला आहे...झोपडीत आता अन्नाचा कणसुद्धा नाही... एकतर आम्हांला धान्य द्या, नाहीतर गावी जाण्याची परवानगी द्याह्ण अशी कैफियत असरोंडी येथील एका चिरेखाणीवर काम करणाऱ्या दहा कामगारांनी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे मांडली.
ही गोष्ट कणकवली कलमठ येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कळली. त्यांनी संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्यावतीने १५ दिवसांसाठी लागणारा किराणा माल, धान्य, भाज्या उपलब्ध करून दिल्या. पोलीस ठाण्यातच निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या उपस्थितीत अन्नधान्याचे वाटप त्या कामगारांना केले. त्यामुळे चिरेखाणीवरील कामगारांच्या चुली पुन्हा पेटल्या आहेत.
कणकवली तसेच मालवण तालुक्याच्या सीमेवरील असरोंडी गावातील चिरेखाण काम करणारे १० कामगार किराणा माल नसल्याने कणकवली पोलीस स्थानकांत गावी जाण्यासाठी परवानगी मागण्यासाठी आले होते. संचारबंदी असल्याने आहे त्या जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास बंदी आहे. मात्र, चिरेखाणीच्या ठिकाणी रहायचे असेल तर या कामगारांकडे अन्न नव्हते. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्या कामगारांनी कणकवली पोलीस ठाणे गाठले.
कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या उपस्थितीत त्या दहा गरजूंना मदत वितरित करण्यात आली. यावेळी संदीप मेस्त्री, पोलीस पाटील संतोष जाधव, नितीन पवार, विठ्ठल चव्हाण, अभी साटविलकर, समीर कवठणकर, केतन दळवी आदी उपस्थित होते.
माणुसकीचे दर्शन
पोलीस ठाण्यात झालेली गर्दी पाहून काही कार्यकर्ते तेथे गेले असता त्यांना कामगारांची समस्या लक्षात आली. या गरजूंना मदतीचा हात देत संदीप मेस्त्री मित्रमंडळाने पंधरा दिवस पुरेल इतके धान्य उपलब्ध करून दिले व माणुसकीचे दर्शन घडविले.