Sindhudurg: भराडी देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २ मार्च'ला आंगणेवाडीत
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 28, 2024 15:25 IST2024-02-28T15:25:07+5:302024-02-28T15:25:55+5:30
बबन शिंदे यांची माहिती : शिवसेनेच्यावतीने होणार जंगी स्वागत

Sindhudurg: भराडी देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २ मार्च'ला आंगणेवाडीत
मालवण (सिंधुदुर्ग ): आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिकोत्सव अर्थात आंगणेवाडी यात्रा २ मार्च रोजी होत आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आंगणेवाडी श्री भराडी देवीच्या यात्रेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असून देवीचे दर्शन घेत नतमस्तक होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्स्फूर्त स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना, मालवण तालुका शिवसेना यांच्यावतीने केले जाणार आहे. अशी माहिती शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे यांनी दिली आहे.
२ मार्च रोजी चिपी विमानतळ येथे मुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन होणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालवण येथील निलरत्न निवासस्थानी ते रवाना होणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री आंगणेवाडी येथे दाखल होत श्री भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. असा दौरा कार्यक्रम असणार आहे. अधिकृत दौरा माहिती प्रशासन स्तरावरून लवकरच जाहीर केली जाईल. उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, लोकसभा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, शिवसेना नेते किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जाणार आहे. असेही बबन शिंदे यांनी सांगितले.
मालवण येथे पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, तालुकाप्रमुख महेश राणे, उपतालुकाप्रमुख पराग खोत, शहर प्रमुख बाळू नाटेकर, महिला उपाजिल्हाप्रमुख निलम शिंदे, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, चाफेखोल सरपंच रविना घाडीगावकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.