नाके तपासणी--

By Admin | Updated: September 11, 2015 23:39 IST2015-09-11T21:30:46+5:302015-09-11T23:39:42+5:30

कोकण किनारा

Checking nose-- | नाके तपासणी--

नाके तपासणी--

गणेशोत्सव जवळ आल्यानंतर जसे आनंदाचे वातावरण असते, तसेच काहीसे काळजीचे वातावरणही तयार होते. मुंबईत गेलेले कोकणवासीय (त्यांना मुंबैकर म्हणायची कोकणची पद्धत आहे) गणेशोत्सवात प्रचंड संख्येने गावाकडच्या घरी येतात. गेली अनेक वर्षे हा रिवाज खंड न पडता सुरू आहे. पण गेल्या काही वर्षात मुंबईकरांबरोबरच आजारही कोकणात येतात, असा अनुभव येऊ लागला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग गेली काही वर्षे सातत्याने मुंबैकरांचे स्वागत आरोग्य तपासणीनेच करत आहे. तपासणी नाक्यांवर नाके तपासली जात आहेत. यंदाही त्याकडे गांभीर्याने पाहावे लागणार आहे. त्यात झालेली हयगय अनेकांना त्रासदायक ठरू शकते.
गणेशोत्सवात कोकणातले वातावरण भारून टाकणारे असते. प्रत्येक घरात मुंबैकर किंवा नोकरीसाठी बाहेरगावी राहणारे लोक दाखल होतात. कोकणातली माणसंच नाही तर घरंही त्यांची वाट पाहात असतात. पण गेल्या काही वर्षात मुंबैकरांच्या येण्याबरोबरच काही साथींचे आजार येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे कोकणात आनंदाबरोबरच थोडी भीतीही येते.
आधीच मुंबईची हवा प्रदूषित. त्यात पावसाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने मुंबई अधिकच धोकादायक होते. २00९ साली सर्वप्रथम हा त्रास जाणवला. त्या वर्षी स्वाईन फ्लूने धुमाकूळ घातला होता. मुंबईत पसरलेला स्वाईन फ्लू मुंबैकरांच्या माध्यमातून कोकणातही पसरण्याची सर्वाधिक भीती होती. तेव्हापासून कोकणात येणाऱ्या मार्गांवर सुरक्षा तपासणीइतकंच महत्त्व आरोग्य तपासणीलाही देण्यात आले. त्या वर्षीपासून गेल्या वर्षीपर्यंत सर्वच ठिकाणी ही तपासणी केली जाते. सर्व रेल्वे स्थानके, बस स्थानके त्याबरोबरच महामार्गावर अनेक ठिकाणी ही तपासणी केली जाते. जी काही आरोग्य यंत्रणा जिल्ह्यात उपलब्ध आहे, ती यंत्रणा गणेशोत्सवापूर्वीचे दोन - तीन दिवस आधीपासूनच कार्यरत होते. येणाऱ्या मुंबैकरांना गेल्या काही दिवसात कसला आजार झाला होता? त्यांना ताप आला होता का? सर्दी-खोकला आहे का, याची माहिती घेतली जाते. ज्यांना सर्दी, ताप, खोकला झालेला असतो, त्यांना तत्काळ औषधे दिली जातात. गेल्या काही वर्षात अशा तपासण्या फलदायी ठरल्या आहेत. त्यातून अनेकांवर औषधोपचार झाला आहे. यंदाही परिस्थिती काहीशी तशीच आहे. मुंबईत स्वाईन फ्लूचे प्रमाण वाढले आहे. आताच्या हवेला स्वाईन फ्लू वाढतो. त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मध्यंतरी रत्नागिरी जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावर्षी मुंबैकरांची तपासणी अधिक गांभीर्याने करावी लागणार आहे.
आरोग्य विभागाने आपल्या कामाची आखणी केली आहे. तपासणी नाके कोठे कोठे केले जातील, तेथे कोण कर्मचारी नियुक्त केले जातील, याचे नियोजनही केले गेले आहे. पण तरीही या तपासणीचे गांभीर्य या कर्मचाऱ्यांना विशेषत्त्वाने पटवून देणे गरजेचे आहे. कोकणातील हवेला अजून प्रदूषणाची फारशी बाधा झालेली नाही. ग्रामीण भागात तर उत्कृष्ट वातावरण असते. त्यामुळे इथल्या हवेत, असे साथीचे रोग निर्माण होण्याची शक्यता तुलनेने कमी आहे. त्यापेक्षा ते मुंबईत जास्त लवकर तयार होतात. वाढतातही. आणि मग कोकणात येतात. अशा साथीच्या आजारांचा कोकणात फैलाव रोखण्यासाठी हे आरोग्य तपासणी नाके अत्यंत गरजेचे आहेत आणि तेथे होणारी तपासणी गांभीर्याने होणे त्याहून गरजेचे आहे.
जेवढे गांभीर्य आरोग्य विभागाकडून अपेक्षित आहे, तेवढेच गांभीर्य पोलिसांच्या वाहतूक विभागाकडूनही अपेक्षित आहे. कोकण रेल्वे आणि खासगी बसेस इतकीच घरगुती गाड्यांची गर्दीही अफाट होते. आरोग्य तपासणीबरोबरच अपघात टाळण्यासाठीही खूप प्रयत्न होणे गरजेचे आहे. लवकर गावी पोहोचण्याच्या आनंदात अनेक वाहनचालक तुफान वेगाने येतात आणि दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान अनेक अपघात घडतात. महामार्गावर ‘ट्रॅफिक जाम’ होते. त्यामुळे खूप मोठा खोळंबा होतो. वाहतुकीच्या खोळंब्यामुळे वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी चालक पुन्हा वेगावर स्वार होऊ पाहतात. त्यामुळे अपघातांची समस्या अधिक तीव्र होऊ लागते. वाहतूक पोलिसांनी हे अपघात कमी व्हावेत, यासाठी आपल्या तपासणी नाक्यांवर मुंबैकर वाहनचालकांना चहा - पाणी देण्याचा उपक्रमही राबवला. वाहनचालकांना थोडे रिलॅक्स होता यावे, त्यांना झोप आली असेल तर ती उडावी, यासाठी पोलिसांनी हा उपक्रम राबवला. अत्यंत स्तुत्य अशा या उपक्रमाचे वाहनचालकांनी उत्साहाने स्वागत केले. यंदाही हा उपक्रम सुरूच राहील, असे अपेक्षित आहे.
तिसरा महत्त्वाचा घटक सार्वजनिक प्रवासी वाहतूक यंत्रणांचा. रेल्वे आणि एस्. टी.ने जादा गाड्यांची तरतूद केली आहे. पावसाळा किंवा अन्य काही कारणास्तव प्रवासात आलेले विघ्न दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी चौकटीबाहेर राहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. एखाद्या स्थानकात रेल्वे अधिक काळ थांबणार असेल तर तशी उद्घोषणा वेळेत केली गेली, प्रवाशांना नेमकी माहिती दिली गेली तर कोठेही गोंधळ उडत नाही. रेल्वे एखाद्या स्थानकात थांबवताना तेथे किमानपक्षी खाण्याची काही सुविधा उपलब्ध आहे का, याची माहिती अधिकाऱ्यांना असणे गरजेचे आहे. नसेल तर ती तरतूद वेळेत करणे गरजेचे आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील मोठा सण आहे. मुंबैकरांचा गावाकडे येण्याचा उत्साह अफाट असतो. अशावेळी साथीचे रोग अथवा अपघात यांसारख्या कारणांमुळे या उत्साहावर विरजण पडू नये, एवढीच अपेक्षा आहे. त्यासाठी यंत्रणांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. काही गोष्टी पूर्णपणे टाळता येत नाहीत. पण त्यांची तीव्रता कमी करणे तरी शक्य असते. त्यासाठीच प्रशासकीय यंत्रणांनी आपल्यादृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. गणपती हाच मुळात विघ्नहर्ता आहे. पण त्याच्या भक्तांसमोर कमीत कमी विघ्ने यावीत, एवढीच अपेक्षा!

मनोज मुळ््ये

Web Title: Checking nose--

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.