चौकुळात जुगार अड्डा उद्ध्वस्त; १५ अटकेत
By Admin | Updated: July 7, 2015 01:02 IST2015-07-07T00:59:25+5:302015-07-07T01:02:01+5:30
२५ लाखांचा मुद्देमाल जप्त : आठवड्यातील दुसरी कारवाई

चौकुळात जुगार अड्डा उद्ध्वस्त; १५ अटकेत
आंबोली : चौकुळ नेनेवाडी येथे सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर पोलीस पथकाने रविवारी रात्री छापा टाकून १५ जणांंना अटक केली. तसेच त्यांच्याकडून रोख रकमेसह २५ लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. या मुद्देमालांमध्ये चार कारसह दुचाकी तसेच किमती मोबाईल, रोख रकमेचा समावेश आहे. अटक केलेल्यांमध्ये सावंतवाडीमधील मोठ्या धेंड्यांचा समावेश असून, अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेले जुगारअड्डेवाल्यांचे कंबरडे मोडण्याची मोहीम नूतन पोलीस अधीक्षक डी. टी. शिदे यांनी आखली आहे. वेंगुर्ले येथील छाप्यानंतर पोलीस उपअधीक्षक अनंत आरोस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गेल्याच आठवड्यात पोलीस अधीक्षक श्ािंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार उपअधीक्षक अनंत आरोस्कर यांच्या पथकाला पाठवून मोठ्या जुगारअड्ड्यांवर छापा टाकला होता. त्यानंतर रविवारी सायंकाळी श्ािंदे यांना चौकुळ नेनेवाडी येथील एका घरात जुगार चालू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार उपअधीक्षक आरोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले व आंबोली येथे रवाना केले.
साधारणत: रविवारी रात्री ९च्या सुमारास हे पथक आंबोलीत पोहोचले. नेनेवाडीत १०.१५च्या सुमारास एका रिकाम्या घरात मोठी पार्टी सुरू होती. त्याचवेळी छापा टाकला. या छाप्याने जुगार खेळणाऱ्यांची एकच पळापळ सुरू झाली. मात्र उपअधीक्षक आरोस्कर यांनी सर्व जुगार खेळणाऱ्यांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले.
यावेळी पथकाला जुगाराच्या सामानासह दारूच्या बाटल्या, गुटख्याची पाकिटे, आदीबरोबरच रोख रक्कम ६२ हजार रुपये तसेच किमती गाड्या, महागडे मोबाईल आढळून आले.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आनंद नारायण मठकर (वय ४५, रा. जुना बाझार, सावंतवाडी) स्वप्निल प्रभाकर मिशाळ (४१, रा. जुना बाझार, सावंतवाडी), रझाक इसाफ नाईक (४१, रा. बाहेरचावाडा, सावंतवाडी), जयंत आप्पा परब (३०, रा. रेडकरवाडी, इन्सुली), राजू मल्लू कुंभार (३३, रा. गावडेशेत, सावंतवाडी), जॉनी लॉरेन्स डिसोझा (४७, रा. जुनाबाझार, सावंतवाडी), दत्ता गोपी नाईक (४८, रा. न्यू सालईवाडा, सावंतवाडी), प्रकाश रघुनाथ नार्वेकर (५०, रा. सालईवाडा, सावंतवाडी), विष्णू पांडुरंग म्हापणकर (३३, रा. नेमळे पाटकरवाडी), संदीप लक्ष्मण सावंत (४२, रा. मळगाव), लक्ष्मण झिलू सावंत (३४, बांदा), प्रदीप अर्जुन पाटील (४०, रा. माठेवाडा, सावंतवाडी), इदियात कासीम मकानदार (४४, रा. चंदगड जिल्हा कोल्हापूर), महेश चंद्रकात बनकुले (वय ३२ रा. चंदगड जिल्हा कोल्हापूर), विवेक राजेंद्र कुवळे (५०, जाधवनगर, बेळगाव, कर्नाटक) आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे असणारी व्हॅगनार कार एम एच ०७ ५३९०, ओमनी मारुती कार एम एच ०७ एबी १७६, ओमनी मारुती कार एम एच ०७ क्यू ९०५३, निसान कंपनीची कार एम एच ०७.१३६, महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार एम एच ०९ बीबी ७०६०, तसेच दुचाकी एम एच ०७ आर ५५३९ आदींसह २५ लाख १५ हजार ७४० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, चौकुळ नेनेवाडी येथून पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास हे पथक आरोपीसह सावंतवाडीत दाखल झाले.
सोमवारी या १५ संशयित आरोपींना सावंतवाडी पोलीस ठाण्यात वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडून देण्यात आले. ही कारवाई सुनील वेंगुर्लेकर, मंगेश शिंगाडे, राजेंद्र शेळके, नितीन उम्रजकर, बी. टी. गवस आदींनी मुख्यालय पोलिसांच्या सहकार्याने केली आहे. आरोपींच्या वतीने अॅड. बापू गव्हाणकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
जुगारावरच्या रकमेबाबत उलट-सुलट चर्चा
चौकुळ नेनेवाडी येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल पाच लाखांच्या घरात रोकड मिळाली होती, पण ती प्रत्यक्षात ६२ हजारच दाखवण्यात आली. वरची रक्कम गेली कुठे, यांचीच चर्चा पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू होती. अनेक कर्मचाऱ्यांनी तर जुगार खेळणाऱ्यांना एका बाजूला घेऊन झाडाझडती घेतली. त्यावेळी मिळालेली रक्कम गुन्ह्यात दाखवण्यातच आली नसल्याचे बोलले जात आहे.
वर्षा पर्यटनाची पार्टी आली अंगलट
चौकुळ नेनेवाडी येथे हे युवक दर आठवड्याला जाऊ न पार्टी करतात. मात्र यावेळची पार्टी या युवकांच्या चांगलीच अंगलट आल्याचे दिसून आले. सायंकाळी जुगार खेळल्यानंतर हे सर्वजण घरी येण्यास बाहेर पडत असतानाच अचानक पोलिसांचा छापा पडला, आणि वर्षा पर्यटनाची पार्टी या युवकांच्या चांगलीच अंगलट आली.