दाखले झाले आॅनलाईन; समस्या अद्याप कायम
By Admin | Updated: November 5, 2014 23:38 IST2014-11-05T22:45:07+5:302014-11-05T23:38:04+5:30
लांजा तालुका : राज्यात नंबर वन आलेल्या तालुक्यात फेरफारीसाठी अडचण

दाखले झाले आॅनलाईन; समस्या अद्याप कायम
लांजा : तालुक्यातील अनेक गावात साधी मोबाईलची रेंज नाही, त्या गावातील शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा व फेरफार उपलब्ध होताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
जनतेला आॅनलाईन संगणकीय सातबारा व फेरफार मिळावेत, यासाठी इथल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि संपूर्ण डाटा संगणकात आणण्यात आला. तालुक्यातील प्रत्येक गावातील सातबारा, फेरफार आठ ‘अ’ ही कागदपत्र तलाठ्यांकडे संगणकावर मिळण्याची सोय १ नोव्हेंबरपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी तलाठी हाती माहिती भरुन देत होते. परंतु आता प्रत्येक सातबारा गटनंबर टाकून लागलीच मिळण्याची सोय प्रशासनाने केली आहे. त्यामुळेच राज्यात लांजा तालुका प्रथम आला आहे. दाखले आॅनलाईन देण्याची प्रक्रिया सुरु झाल्यावर सर्व तलाठ्यांना लॅपटॉप घ्यायला लावले. प्रशासनाकडून मोडॅम ही सुविधा देण्यात आली. तलाठी कार्यालयात प्रिंटरही बसविण्यात आले. या सर्व सुविधा देण्यात आल्या. परंतु आॅनलाईन दाखले देण्यासाठी इंटरनेटच नाही तर दाखले देणार कसे? असा प्रश्न तलाठी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत आहे. काही तलाठी कार्यालयाना स्वत:ची जागा नसल्याने भाड्याच्या खोलीत आहेत. काही कार्यालयांमध्ये लाईटची सुविधा नाही, अशी अवस्था ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयांची आहे. हे सर्व मॅनेजही होईल. पण, ज्या गावात मोबाईलची संधी रेंज नाही. त्या गावात सातबारा द्यायचे कसे, असा प्रश्न तलाठ्यांना भेडसावत आहे.
कोकणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता सर्व सातबारा, फेरफार, आठ अ संगणकीकृत करण्यात आले आहेत. १ नोव्हेंबरपासून तलाठी हाती लिखाणाचे दाखले देणे बंद करणार आहेत. मग इंटरनेटअभावी तलाठी गावातील शेतकऱ्यांना दाखले देणार कसे आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला आपले दाखले काढण्यासाठी पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी खेटे मारावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ व आर्थिक भुर्दंड वाढणार आहे. राज्यात नंबर वन आलेल्या तालुक्यात मोबाईल रेंज तसेच इंटरनेटही नसल्याने शेतकऱ्यांसमोर समस्या उभी राहिली आहे. सातबारा आॅनलाईन करण्यात तालुका राज्यात प्रथम आल्याने तालुक्याची मान उंचावली आहे. मात्र, सर्व पायाभूत सुविधा आहेत का? याचा विचार करुनच त्यानंतर अंमलबजावणी करणे गरजेचे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
प्रत्येक गावातील सातबारा, फेरफार आठ ‘अ’ ही कागदपत्र तलाठ्यांकडे संगणकावर १ नोव्हेंबरपासून देण्यास दिमाखात प्रारंभ.
आता प्रत्येक सातबारा गटनंबर टाकल्यावर दाखला मिळणे शक्य.
आॅनलाईन दाखले देण्यासाठी इंटरनेट नसल्याने गैरसोय.