शतायु ग्रंथसंमेलन : अधिवेशनाच्या तयारीत चिपळूणकर गुंतले
By Admin | Updated: October 5, 2014 23:08 IST2014-10-05T22:11:31+5:302014-10-05T23:08:31+5:30
चिपळूणच्या सुकन्या, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन उपस्थित राहणार

शतायु ग्रंथसंमेलन : अधिवेशनाच्या तयारीत चिपळूणकर गुंतले
चिपळूण : चिपळूण येथे दि. ९ ते ११ जानेवारी २०१५ रोजी शतायु ग्रंथालये आणि ग्रंथकार यांचे अधिवेशन होत आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे होत असल्यामुळे अधिवेशनाच्या उद्घाटनाला चिपळूणच्या सुकन्या, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी कार्यालयाचा शुभारंभ नुकताच झाला. विचारवंत व लेखक, समीक्षक प्रसिद्ध असलेले प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते २ आॅक्टोबर रोजी कार्यालयाचे उद्घाटन झाले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून या अधिवेनाबद्दल प्रा. जोशी यांनी आनंद व्यक्त केला आणि अशा अधिवेशनांची गरज आणि महत्त्व अधोरेखित केले. वक्ता-श्रोता, लेखक-वाचक यांना एकत्र आणण्याचे काम ग्रंथसेवक, ग्रंथपाल व ग्रंथालये करीत असतात. अनुदानात झालेली कपात, तरुणवर्गात सोशल मीडियामुळे वाचनाचा असलेला अभाव अशा अनेक समस्यांमुळे वाचनालये चालवणे कठीण झाले आहे. पुस्तकांची विक्री वाढते आहे. पण, त्यात उपयुक्त माहितीपर पुस्तकेच खपत आहेत.
कथा, कविता, कादंबऱ्या अशा ललित वाङमयामुळे भावनांचा परिपोष होतो आणि सांस्कृतिक मूल्ये रुजतात. पण, अशी पुस्तके फार कमी विकत घेतली जातात. आई, वडील, आजोबा यांच्या हातात सतत पुस्तके दिसली तर मुलांवर वाचनाचे संस्कार होतात. पण किती पालक या जाणीवेने सभासद होतात? आज खऱ्या विचारवंतांची आणि कार्यकर्त्यांची वानवा आहे. विचारवंत जेव्हा कृतीहीन बनतात आणि कृतीवीर जेव्हा विचारहिन बनतात तेव्हा समाज स्वास्थ्य धोक्यात येते. आत्मियता असणारे ग्रंथपाल नवी पुस्तके स्वत: वाचतात व सभासदांना वाचायला प्रवृत्त करतात. पण, ग्रंथपालानाच जर पुरेसे वेतन वाचनालये देऊ शकत नसतील तर त्यांच्याकडून निष्ठेची, आत्मियतेची अपेक्षा कशी करणार? अशा अनेक प्रश्नांना एकत्रित सामोरे जाण्यासाठी अधिवेशनांची, व्यासपीठाची गरज आहे.
साहित्य संमेलनाप्रमाणेच हे अधिवेशन होईल, अशी खात्री देऊन प्रा. जोशी यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यवाह प्रकाश काणे यांनी प्रस्तावना केली. अध्यक्ष अरविंद जाधव यांनी मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी गिरीधर साठे यांना पुणे मराठी गं्रथ संग्रहालय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला सुचय रेडीज, दुर्गे, दलितमित्र तात्या कोवळे, राष्ट्रपाल सावंत, डॉ. शारंगपाणी, मीनल ओक, अंजली बर्वे, महम्मद घारे उपस्थित होते. सूत्रसंचालन अरुण इंगवले यांनी केले व आभार प्रदर्शन केले. (प्रतिनिधी)