काजू व्यावसायिकांना भरपाई द्यावी
By Admin | Updated: December 29, 2014 00:07 IST2014-12-28T22:46:48+5:302014-12-29T00:07:51+5:30
बाबल नाईक : अवकाळी पाऊस ठरला पिकासाठी हानिकारक

काजू व्यावसायिकांना भरपाई द्यावी
कसई दोडामार्ग : अवकाळी पावसामुळे व बदललेल्या वातावरणामुळे काजू बागायतीला फटका बसून जवळजवळ ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तरीही कृषी विभागाकडून नुकसानाचे पंचनामे न झाल्याने कोकणातील काजू व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे काजू व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाने याची दखल घेऊन काजू व्यावसायिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काजू व्यावसायिक बाबल नाईक यांनी केली आहे.
मोहोर येत असताना पडलेला अवकाळी पाऊस काजू उत्पादनासाठी धोकादायक ठरला आहे. या पावसामुळे काजू व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यासाठी कृषी विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी केली होती. मात्र, शासनाच्या उदासिन धोरणामुळे कृषी विभागाने याची साधी दखलसुद्धा घेत बागायतींना भेटही दिली नाही. याचा फटका काजू व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे काजू व्यावसायिकांनी पत्रकारांना बोलावून काजू बागांची पाहणी करून घेतली. यावेळी केलेल्या पाहणीत काजू बागायतींना अवकाळी पावसाचा बराच फटका बसल्याचे दिसून आले. काजू मोहोर करपून गेला असून काही झाडांना मोहोर न येता पालवी आली असल्याचे आढळून आले. यामुळे काजू पीक होणार नाही, असे नाईक यांनी सांगितले. यावेळी चंद्रशेखर देसाई, काजू व्यावसायिक सूर्यकांत देऊलकर, शरद गवस, मायको गवस, सुुवदास मणेरीकर, शरद नाईक उपस्थित होते.
यावेळी बाबल नाईक म्हणाले, ज्यावेळी काजू झाडांना मोहोर येतो, त्याचवेळी अवकाळी पाऊस पडल्याने आलेला मोहोर करपून गेला व झाडांना मोहोर येण्याऐवजी नवीन पालवी आली. त्यामुळे विकसित १ या काजू झाडांना फटका बसला आहे. ही जात हंगामात एकदाच मोहरते. तसेच १ ते १७ काजू बागायतदारांना याचा फटका बसला आहे. तसेच दमट हवामानामुळे कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. झाडांच्या फांदीचा रस शोषून हे कीटक नष्ट करतात. त्यामुळे मोहोर आलेल्या फांद्या करपून गेल्या आहेत. असे असताना कृषी विभागाने बागायतदारांची विचारपूसही केली नाही. झाडांचे पंचनामे केले नाहीत. शासनाच्या जाचक अटीमुळे कोकणातील काजू बागायतदार, सुपारी बागायतदार, नारळ बागायतदार, आंबा बागायतदार यांना नुकसान भरपाई मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली. तसेच येथील हवामानाचा विचार करून शासनाने नियमावली तयार करावी. तसेच पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाबल नाईक यांनी दिला आहे.
उद्योजक चंद्रशेखर देसाई म्हणाले, तालुक्यात ३२०० हेक्टर काजू क्षेत्राची नोंद असली, तरी यापेक्षा अधिक पटीने काजू बागायतीचे क्षेत्र आहे. परंतु त्याची नोंद कृषी विभागाकडे नाही. जंगली भागात मोठ्या प्रमाणात काजू लागवड केली जाते. नुकसानग्रस्त बागायतदारांसह काजू उद्योजकांनाही आर्थिक सहकार्य करणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली. (वार्ताहर)