जातनिहाय सर्व्हेत चुका; कुडाळकर हैराण
By Admin | Updated: March 19, 2015 23:50 IST2015-03-19T20:59:51+5:302015-03-19T23:50:45+5:30
दुरुस्तीसाठी गर्दी : चुका सुधारण्यासाठी अधिकारी पाठविण्याची मागणी

जातनिहाय सर्व्हेत चुका; कुडाळकर हैराण
कुडाळ : सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना २०११च्या यादीत नावांचा घोळ झाल्याने कुडाळ तहसील कार्यालय येथे नावात दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची बुधवारी गर्दी झाली होती. प्रशासनाच्या चुकीचा त्रास आम्हाला का, असा सवाल करून चुका सुधारण्यासाठी गावागावांत अधिकारी पाठवा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शासनाने सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय जनगणनेनुसार, प्रत्येक कुटुंंबाची नावे व माहिती यादी केली. या यादीतील माहितीत कोणत्याही प्रकारच्या चुका आहेत का, ते प्रत्येकाने तपासा व यासाठी प्रत्येक गावातील यादी त्या त्या ग्रामपंचायतीत ठेवल्या होत्या. या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात जनतेच्या नावामध्ये, पत्त्यांमध्ये चुका आढळून आल्या. आता या चुका सुधारण्यासाठी सर्व गावांतील जनतेला कुडाळ तहसील कार्यालयात यावे लागले. सोमवारी चुकांची दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या कुडाळ तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी यातील काहीजणांना यासंदर्भात विचारले असता, या यादीमध्ये आम्ही योग्य प्रकारे आमच्या कुटुंबीयांची नावे, पत्ता याची माहिती दिली होती. तसेच अर्जही योग्य प्रकारे भरला होता. परंतु आता प्रसिद्ध झालेल्या या यादीमध्ये आमची नावे, पत्ते चुकलेले आहेत. आमची चूक नसतानाही शासनाच्या चुकीमुळे आम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
गावात अधिकारी नेमावेत
आम्ही माहिती योग्य देऊनही प्रशासनाने चुकीची नावे, पत्ते लिहिली असून, आता या चुकीची दुरुस्ती करण्याकरिता येथील सामान्य जनतेला वारंवार तालुक्याच्या ठिकाणी येता येणे शक्य होणार नाही.
त्यामुळे प्रशासनाने या यादीतील दुरुस्ती करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून गावागावांत अधिकारी नेमावेत, अशी मागणी केली.