सावंतवाडीत कारची दुचाकीला धडक
By Admin | Updated: June 24, 2014 01:44 IST2014-06-24T01:15:51+5:302014-06-24T01:44:21+5:30
युवक भाईसाहेब आयुर्वेदिक महाविद्यालयाचे विद्यार्थी

सावंतवाडीत कारची दुचाकीला धडक
सावंतवाडी : गोव्याहून सावंतवाडीकडे येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की, कारने आपली दिशा बदलत या युवकांना धडक दिली. धडकेतील एका युवकाची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. हे दोघे युवक येथील भाईसाहेब आयुर्वेदिक महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
याबाबत माहिती अशी की, सोमवारी रात्री सावंतवाडीतील वेंगुर्ले बसस्थानकानजीक गोव्याहून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने आपली दिशा चुकवत विरूध्द दिशेने सावंतवाडीकडे जाणाऱ्या दुचाकीवर कार जोरदार आदळली. यात आयुर्वेदिक महाविद्यालयाचे दोन युवक जखमी झाले.
जखमींमध्ये शांतीलाल सोमा भाये (२१, रा. कुकुडणे, सुरगाणा) व नीतेश प्रकाश हराळ (२२, रा. नाशिक) या दोघांचा समावेश असून दुचाकीला धडक दिल्यानंतर कार जावून रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीला आदळली. हा अपघात रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धावाधाव करीत जखमींना कुटिर रूग्णालयात दाखल केले. यातील एका जखमीच्या पायाचे हाड बाहेर आले असून त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत शस्त्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, अपघातातील जखमींना मदत मिळावी यासाठी उशिरापर्यंत आयुर्वेदिकचे विद्यार्थी संबंधित चालकाशी चर्चा करीत होते. ही धडक देणारी कार ही सावंतवाडीतील युसूफ नामक व्यक्तीची असून तिची पूर्ण नोंद पोलीस ठाण्यात झाली नाही. अपघातानंतर कुटिर रूग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अपघाताची माहिती शांतीलाल भाये याने पोलिसांत दिली आहे. अपघातातील घटनेचा पंचनामा करण्याचे काम पोलीस उपनिरिक्षक केशव पेडणेकर उशिरापर्यंत करीत होते. (वार्ताहर)