सिंधुदुर्गात हळद लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी लोकसहभागातून बियाण्यांची बँक बनवा - पालकमंत्री चव्हाण
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 29, 2023 17:40 IST2023-05-29T17:39:52+5:302023-05-29T17:40:45+5:30
फोंडाघाट येथे २ लाख २० हजार हळद रोपे तयार करण्यात आली

सिंधुदुर्गात हळद लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी लोकसहभागातून बियाण्यांची बँक बनवा - पालकमंत्री चव्हाण
सिंधुदुर्ग : हळदीचे लागवड क्षेत्र जिल्ह्यात वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना हळदीची रोपे, कंद हे योग्य भावात मिळायला हवीत. त्यासाठी लोकसहभागातून बियाण्यांची बँक बनवा, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कृषी विभागाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हळद लागवड नियोजन बैठक आज घेण्यात आली. बैठकीला आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत उपस्थित होते.
प्र. कृषी विकास अधिकारी विरेश अंधारी यांनी संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली. सध्या जिल्ह्यात २५० हेंक्टर हळद लावगड क्षेत्र असून, ते २ हजार हेंक्टरवर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जाणार आहे. शिवाय फोंडाघाट येथे २ लाख २० हजार हळद रोपे तयार करण्यात आली आहेत.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांना योग्य भावात बियाणे मिळायला हवीत. चढ्या भावाने त्याची विक्री होणार नाही. यासाठी त्यावर नियंत्रण ठेवा. ‘मागेल त्याला हळद रोपे’ असा उपक्रम सुरु करा. त्यासाठी लोकसहभागातून बँक बनवा. शिवाय मागील वर्षी उत्पादन झालेल्या हळदपूड खरेदीसाठी व्यवस्था करा आणि हळद लागवडीचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करा, असेही ते म्हणाले.