ओरोस : भारतासहित जगातील बौद्ध समाजासाठी अत्यंत पवित्रस्थळ असलेल्या बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ आणि अन्यायकारक बोधगया मंदिर कायदा रद्द करावा तसेच महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील बौद्ध समाजाने एकजुटीचे दर्शन घडवित आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी विविध घोषणा देऊन येथील परिसर दणाणून सोडला.सम्राट अशोक यांनी इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले. तथागत बुद्धाला ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. त्यामुळे देशातील नव्हे, तर जगभरातील बौद्ध अनुयायी भिक्खू आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात. मात्र, या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही.महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी १९९२पासून आंदोलन होत आहेत. तरी महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात आला नाही. तेथे पूजा आणि कर्मकांड केली जातात. ज्या रूढी परंपरांना तथागत गौतम बुद्ध यांनी नाकारले तीच कर्मकांड येथे सुरू आहेत.सम्राट अशोक यांनी बिहार बोधगया येथे महाबोधी महाविहार निर्माण केले आहे. त्यामध्ये बोधगया येथील महाबोधी महाविहार हे स्थळ आहे. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करावा व महाबोधी महाविहार मुक्त करावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
अनेक बौद्ध बांधव झाले सहभागीसिंधुदुर्ग बौद्ध महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांततेत आणि शिस्तबद्ध मोर्चा काढला. यावेळी भन्ते सचित बोधी, भन्ते प्रज्ञावंत, भन्ते अश्वजीत, विद्याधर कदम, अंकुश कदम, प्रभाकर जाधव, आनंद कासार्डेकर, सुषमा हरकुळकर, शारदा कांबळे, अंजली कदम, संदीप कदम, श्यामसुंदर जाधव, ॲड. एन पी. मठकर यांच्यासह अनेक बौद्ध बांधव या मोर्चाच्यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन दिले.
शांततेत मार्गदर्शनमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बौद्धांच्या प्रार्थनेने सभेला सुरुवात करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना सभेत मार्गदर्शन केले.