भाऊबीज निधी देतोय शिक्षण संस्थेला हात

By Admin | Updated: October 23, 2014 22:53 IST2014-10-23T20:43:03+5:302014-10-23T22:53:36+5:30

मेधा पाटणकर : गेली बारा वर्षे राबवताहेत आगळावेगळा उपक्रम

Brothers give fund to the educational institution | भाऊबीज निधी देतोय शिक्षण संस्थेला हात

भाऊबीज निधी देतोय शिक्षण संस्थेला हात

असगोली : संस्कृत विषयाच्या शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्यानंतरही सेवा म्हणून संस्कृतचे मोफत वर्ग घेणाऱ्या मेधा पाटणकर गेली १२ वर्षे दिवाळीच्या सुटीत भाऊबीज निधी जमवून महर्षी स्त्री शिक्षण संस्थेला देत आहेत.
विशेष म्हणजे पाटणकर केवळ एकट्याने हे काम न करता बँकेचे शाखा व्यवस्थापक, निवृत्त कर्मचारी, शिक्षण, विद्यार्थी यांच्या माध्यमातून हा निधी गोळा करतात. महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब, निराधार, स्त्रियांसाठी शिक्षण व रोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी बनवले जाते. नेहमीच्या शिक्षणाबरोबरच अभियांत्रिक शिक्षण, फॅशन डिझायनिंग, नर्सिंग इत्यादी व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाते. वृद्ध स्त्रियांसाठी वृद्धाश्रम चालवला जातो. या संस्थेने १९१९ साली भाऊबीज निधी संकलन योजनेला सुरुवात केली. यात जमणाऱ्या गंगाजळीमधून महाराष्ट्रातील गरीब, गरजू, हुशार, होतकरु मुलींना शिक्षणासाठी संधी दिली जाते. अन्य कुठेही हा निधी खर्च केला जात नाही.
गुहागर तालुक्यातील वेळंब येथील लक्ष्मीबाई विनायक ओक भाऊबीज निधीचे काम करत असत. त्यांच्या बरोबरीने मेधा पाटणकर यांनी भाऊबीज निधीचे काम करण्यास सुरुवात केली. वृध्दत्त्वामुळे निधी जमवण्यासाठी करावी लागणारी धावपळ जमत नसल्याने ओक यांनी या कामाची पूर्ण जबाबदारी पाटणकर यांच्याकडे सोपवली. गुहागरच्या गोपाळकृष्ण विद्यामंदिरमध्ये संस्कृत शिकवणाऱ्या पाटणकर यांनी हे काम एकट्याने न करता विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन निधी जमवण्याच्या कामाला सुरुवात केली. आज केवळ विद्यार्थीच नाही तर बँकेतील शाखा व्यवस्थापक, काही शिक्षक-प्राध्यापक, निवृत्ती घेतलेले ग्रामस्थ त्यांना या कामात मदत करत आहेत. पाच वर्षांपूर्वी पाटणकर निवृत्त झाल्या. पण, त्यानंतरही संस्कृतचे मोफत वर्ग घेणे आणि महर्षी स्त्री शिक्षण संस्थेसाठी भाऊबीज निधी जमवून देण्याचे काम त्यांनी सुरु ठेवले आहे. तसेच दिवाळी आली की, देणगीदार आवर्जून निधीची आठवण करतात, असेही पाटणकर यांनी सांगितले. (वार्ताहर)

बँकेचे शाखा व्यवस्थापक, निवृत्त कर्मचारी, शिक्षण, विद्यार्थी यांच्या माध्यमातून केला जातो निधी गोळा.
भाऊबीज निधीतून राज्यातील गरीब, गरजू, हुशार, होतकरु मुलींना दिली जाते शिक्षणासाठी संधी.
यापूर्वी वेळंब येथील लक्ष्मीबाई विनायक ओक करत होत्या भाऊबीज निधीचे काम.

Web Title: Brothers give fund to the educational institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.