किनाऱ्यांवर काळ्या तेलाचे थर
By Admin | Updated: August 25, 2014 22:12 IST2014-08-25T21:29:57+5:302014-08-25T22:12:11+5:30
जैवविविधता धोक्यात : मत्स्योत्पादनावरही विपरीत परिणाम

किनाऱ्यांवर काळ्या तेलाचे थर
संदीप बोडवे - मालवण --सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला या तीन तालुक्यांची किनारपट्टी काळ््या तेलाच्या तवंगामुळे प्रदूषित झाली आहे. सागरी उधाण आणि भरतीच्यावेळी किनारपट्टीवर काळे तेल आणि त्या काळ््या तेलाचे गोळे जमा होऊ लागले आहेत. पर्यावरणास घातक असलेल्या काळ््या तेलाच्या तवंगामुळे सिंधुदुर्गची सागरी जैवविविधता धोक्यात येत असून शासनाने या संदर्भात प्रभावी धोरण आखण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील दोन वर्षे सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर एकाचवेळी स्वच्छता मोहीम राबवून किनाऱ्यांवरील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात आली. भारत सरकारने संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) जीईएफ आदींच्या माध्यमातून हाती घेतलेल्या ‘सागरी जैवविविधतेचे संवर्धन, जतन आणि तिचा शाश्वत वापर’ या प्रकल्पाअंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेनंतर प्रकल्पकर्ते आणि शासनाकडून प्लास्टिक निर्मुलनासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र किनारपट्टीवर पसरत असलेल्या काळ््या तेलाच्या थरांमुळे सागरी प्रदूषणाचा प्रश्न अजूनही गंभीर राहिला आहे. काळ््या तेलाच्या तवंगामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील जैवविविधता झपाट्याने धोक्यात येत असताना जैवविविधतेसंदर्भातील प्रकल्पकर्त्यांनी तसेच शासनाने या प्रदूषणाकडे अद्याप फारसे लक्ष दिलेले नाही. यंदाच्या पावसाळ््यात देवबाग, तोंडवळी, आचरा, तळाशिल, मिठमुंबरी तसेच वायंगणीच्या समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर तेलाचे तवंग आढळून आले. तेलाच्या थरामुळे तसेच काळ््या व घट्ट गोळ््यांमुळे किनारे प्रदूषित झाले. खाडी किंवा समुद्रकिनारी पावसाळ््यात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना याचा त्रास अधिक जाणवला.
अनेकवेळा काळ््या तेलाच्या तवंगामुळे किनाऱ्याकडे येणारी मासळी कमी झाल्याची तक्रार मच्छिमारांनी नोंदवली. किनाऱ्यांवर पसरणारे तेल क्रुड आॅईल तसेच बोटींचे इंधन असल्याचे स्थानिक मच्छिमारांनी सांगितले. बॉम्बे हाय येथे तेल निर्मिती क्षेत्र आहे. मुंबईजवळच मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी येथे मोठ्या मालवाहू बोटींच्या इंजिनांचे वंगण तेल बदलण्याचे काम केले जाते. बदललेले खराब तेल समुद्रात सोडण्यात येते. दरवर्षी पावसाळ््यात किनाऱ्यांवर प्लास्टिक कचरा, तुटलेली जाळी, शितपेयांचे डबे, खाद्यपदार्थांची वेस्टणे आदी कचरा वाहून येतो. यंदा या कचऱ्याबरोबरच तेलाचे गोळे वाहून आल्याने किनारपट्टी अस्वच्छ झाली.
मच्छिमारांचे नुकसान
पावसाळ््यात समुद्रात व खाड्यांमध्ये गळ टाकून, पागुन किंवा लहान जाळ््यांद्वारे किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते. या मासेमारीमध्ये सोनम, कोकर, मोरी, वागळी, तांबोशी, पालू, शेंगटी आदी ठराविक प्रकारचे मासे पुरेशा प्रमाणात मिळतात. पावसाळ््यात तेलाच्या तवंगामुळे या माशांनी किनाऱ्यापासून दूर राहणे पसंद केल्याने मच्छिमारांचे नुकसान झाले आहे.
- आनंद मालंडकर, ज्येष्ठ कासवमित्र, मालवण
जीव साखळी धोक्यात
औद्योगिक क्षेत्रातील रसायन मिश्रीत सांडपाणी समुद्रात सोडण्यात येत असल्याने समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. यामुळे सागरी जीव साखळी धोक्यात आली आहे. यावर वेळीच आवर घालण्याची गरज आहे. अन्यथा सागरी प्रदुषण वाढत जाणार आहे आणि त्याचे विपरीत परिणाम आगामी काळात सर्र्वानाच भोगावे लागणार आहेत.
- गंगाराम घाडी, अध्यक्ष, जिल्हा श्रमजिवी रापण संघ
किनारा बनला तेलयुक्त
मालवाहू बोटींच्या अपघातातूनही समुद्रात तेल गळती होते. ८ आॅगस्ट २०१० रोजी मुंबईजवळ मालवाहू बोटींची टक्कर झाल्याने हजारो लिटर तेलाची समुद्रात गळती झाली होती.
याचा परिणाम म्हणून २०१० साली समुद्रातील मासे मरून किनाऱ्यांना लागत होते.
सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पावसाळ््यात काळे तेल व त्याचे गोळे वाहून आल्याने किनाऱ्यांवर तेलाचे थर पसरले होते.
येथील चिवला, तारकर्ली, देवबाग, कुणकेश्वर, निवती हे किनारे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्धीस येत आहेत. किनाऱ्यांवरील तेलाचे थर तसेच खडकांना तेलाचे तवंग चिकटल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तेलामुळे किनारे दूषित झाल्यास पावसाळी पर्यटनावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.