Sindhudurg: गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी, शिरगाव येथील घटना 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 29, 2024 01:41 PM2024-03-29T13:41:14+5:302024-03-29T13:42:04+5:30

हल्ल्याची पंधरा दिवसांतील दुसरी घटना

Bike rider seriously injured in gaur attack, incident at Shirgaon Sindhudurg | Sindhudurg: गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी, शिरगाव येथील घटना 

Sindhudurg: गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी, शिरगाव येथील घटना 

दिनेश साटम

शिरगाव : देवगड तालुक्यातील शिरगाव-कुवळे मार्गावर शिरगाव चौकेवाडी फाट्यानजीक बाबल्या गणपत पवार या दुचाकीस्वारावर गव्याने केलेल्या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना काल, गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली.

साळशी ओहोळानजीक कातकरी समाजाच्या वस्तीत राहणारे बाबल्या गणपत पवार हे शिरगावहून आपल्या (एमएच ०७, एक्यू ५४२) या दुचाकीने घराकडे जात असताना चौकेवाडी फाट्यानजीक त्यांच्यावर गव्याने हल्ला केल्याने दुचाकीची चेस मोडली असून, बाबल्या पवार यांनाही उजव्या हाताला आणि पायाला मार बसला आहे. ही घटना घडल्यानंतर याच मार्गावरून त्यांच्याच वस्तीत राहणारे सत्यवान पवार हे पत्नीसह दुचाकीवरून प्रवास करत असताना बाबल्या पवार हे गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने शिरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना शुक्रवारी अधिक उपचारांसाठी कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, देवगड वनपाल सारीक फकीर यांना माहिती मिळताच घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. तसेच जखमीचीही रुग्णालयात उपचार घेत असताना विचारपूस केली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, शिरगाव विभागप्रमुख मंगेश फाटक, अजित परब, मंगेश शिंदे, सूर्यकांत तावडे, राजेंद्र पोकळे, कातकरी समाजबांधव उपस्थित होते.

गव्यांच्या वावरामुळे भीती

देवगड-नांदगाव मार्गावर शिरगाव राकसघाटी तसेच शिरगाव-कुवळे या मार्गावर दिवसेंदिवस गव्यांचा वावर वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिरगाव-कुवळे मार्गावर तिन्हीसांजेनंतर खासगी वाहनांची वर्दळ गव्यांचा वावर वाढल्याने भीतीमुळे कमी झाली आहे. वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

हल्ल्याची पंधरा दिवसांतील दुसरी घटना

९ मार्च रोजी रात्री देवगड-नांदगाव मार्गावर शिरगाव राकसघाटी येथे चारचाकी गाडीवर गव्याने हल्ला करून दर्शनी भागाची काच फोडली होती. केवळ दैव बलवत्तर म्हणून चारचाकीतील प्रवासी वाचले होते. त्यानंतर शिरगाव-कुवळे मार्गावर पुन्हा गव्याच्या हल्ल्याची पुनरावृती झाल्याने ग्रामस्थ तसेच वाहनचालकांत भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Bike rider seriously injured in gaur attack, incident at Shirgaon Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.