मुंबई-गोवा मृत्यूचा महामाग
By Admin | Updated: November 23, 2014 23:44 IST2014-11-23T22:15:42+5:302014-11-23T23:44:44+5:30
हायवेचा झाला डायवे : बेशिस्त वाहतूक, वाढलेल्या वाहनांमुळे निरपराधांचा बळी...र्!

मुंबई-गोवा मृत्यूचा महामाग
श्रीकांत चाळके - खेड--मुंबई - गोवा महामार्गावर सध्या अपघातांची मालिका सुरू आहे़ ती खंडित करण्यासाठी ज्या ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे, त्यांची महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी ठोस अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत या मार्गावर ३ हजारांहून अधिक बळी गेले आहेत. अपघातात बळी जाणाऱ्यांचा हा आकडा कमी करण्यासाठी पोलीस आणि महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन तसा प्रस्ताव पाठविणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भोस्ते घाटात झालेल्या अपघातांची भीषणता अधोरेखित झाली आहे़
सद्यस्थितीत या महामार्गावर वाहनांचा मोठा भार आहे. त्यामुळे अपघातांची संख्याही लक्षणीय आहे. अपघातांची संख्या लक्षात घेता अपघाताला कारणीभूत असलेल्या वाहनचालकांचा परवाना, वाहनांची नोंदणी रद्द करण्यासंबंधी आतापर्यंत पोलिसांकडून प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे एकही प्रस्ताव गेला नाही हे विशेष! याशिवाय गाडीचा परवाना आणि नोंदणी रद्द करण्याचा अधिकार परिवहन कार्यालयाला आहे. मात्र, यासाठी पोलिसांकडून प्रस्ताव पाठवण्यात येत नाहीत. त्यामुळे वाहनचालक बिनधास्त असतात. पोलीस यंत्रणेकडून याबाबत कमालीची उदासीनता दिसून येत असल्याने अनेक वाहनचालकांचा मुजोरपणा वाढत आहे.
महामार्गावर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत गेल्या १० वर्षात कमालीची वाढ झाली आहे. अपघातांची आणि त्यामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या चिंताजनक आहे. हजारो वाहने या मार्गावर धावत आहेत. यामध्ये अवजड वाहनांची संख्या लक्षणीय आहे. त्यांची देखभाल न करणे तसेच वाहनांचा अतिवेग आणि मद्यप्राशनासह वाहनचालकांचा मुजोरपणा यामुळे अवघड वळणावर अनेक अपघात झाले आहेत़
गेल्या काही दिवसात वाढलेल्या अपघातांचे प्रमाण पाहता वाहनचालकांसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे. काही वाहनचालकांचा बेशिस्तपणा निरपराध वाहनचालकाच्या जिवावर बेतत आहे. त्यामुळे मृत्यूचा महामार्ग अशी मुबई-गोवा महामार्गाची ओळख झाली आहे. गेल्या काही वर्षात शेकडो बळी घेणाऱ्या या महामार्गाने अनेकांना कायमचे जायबंदीही केले आहे. हे रोखण्याकरिता महामार्ग वाहतूक पोलीस यत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. पोलिसांनी अर्थपूर्ण व्यवहाराला आळा घालून निर्बंध लादल्यास भीषण अपघातांची संख्या नक्कीच कमी होऊ शकेल. अवजड वाहनचालकांच्या मुजोरपणामुळे अनेकवेळा दुचाकीस्वारांचा जीव जाण्याच्या प्रकारात वाढ होत आहे, हे भीषण वास्तव आहे. अपघातग्रस्तांना सरकारी तूटपुंजी मदत जाहीर करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात असल्याचे म्हटले जात आहे.
अपघात-५०५ मृत्यू-७३
गंभीर-१२० किरकोळ जखमी-३७०
अपघात-४८१ मृत्यू-७५
गंभीर-१९२ किरकोळ जखमी-४८२
अपघात-४८७ मृत्यू-६१
गंभीर-२०३ किरकोळ जखमी-२३२
अपघात-४६३ मृत्यू-१२
गंभीर-२०६ किरकोळ जखमी-२२९
अपघात-५०० मृत्यू-७५
गंभीर-२१७ किरकोळ जखमी-४१३
अपघात-४३८ मृत्यू-७१
गंभीर-२२१किरकोळ जखमी-४१५