भजनाच्या जागराने उत्साहाला उधाण
By Admin | Updated: September 27, 2015 00:38 IST2015-09-27T00:21:07+5:302015-09-27T00:38:41+5:30
युवा वर्गाचा सहभाग : नवीन चाली ठरताहेत ‘सुपरहिट’

भजनाच्या जागराने उत्साहाला उधाण
सिद्धेश आचरेकर, मालवण : कोकणवासीयांचा महाउत्सव म्हणजे लाडक्या बाप्पाचा सण. गणेश चतुर्थी कालावधीत कोकणात प्रामुख्याने सिंधुदुर्गात भजन कलेला वेगळेच महत्त्व आहे. त्यामुळे भजनाच्या जागर गणेशोत्सवाच्या धामधूमीत महत्वाची भूमिका बजावतो. तसेच जिल्ह्यात भजन संप्रदाय आणि गणेशोत्सवाचे वेगळेच नाते कित्येक वर्षे चिरकाल टिकून आहे. जिल्ह्यात गेले दहा दिवस भजनांच्या जागराने सर्वत्र वातावरण मंगलमय बनले आहे. प्रासादिक भजन मंडळांना गणेश चतुर्थी सणात मोठी मागणी असते. त्यामुळे जिल्ह्यात भजनच्या स्वरांनी गणेश भक्त न्हाऊन गेले आहेत.
१७ ते २७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवाची धामधूम जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सुरु आहे. याच धामधुमीत भजन खरी रंगत आणते. भजनाची गोडी अबाल-वृद्धांपर्यंत असल्याने भजनाला वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. गणपतीचे ११ दिवस भजनाच्या जागरांनी हरएक रात्र स्वरमय आहे. या अहोरात्र जागराने बाप्पाच्या उत्साहाला उधाण प्राप्त झाले आहे. गणरायाची मनोभावे सेवा करण्यासाठी आतुरलेली भजन मंडळे तन-मन-धन विसरून हरिनामाच्या जपात तल्लीन झाल्याचे सर्वत्र चित्र आहे. इंटरनेट, सोशल मीडियाच्या जाळ्यात भरकटत गेलेला युवा वर्गही भक्तीरसात गुंतला आहे.
शास्त्रोक्त संगीत शिक्षण घेतलेले बुवा अशा या गणेशोत्सवातून उदयास येत आहेत. उदयोन्मुख बुवांसाठी नव्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांच्या हटके चाली तर भजनावर अधिराज्य गाजवत आहे. तरुण कोरसना नव्या दमाच्या गाण्याच्या चालीतून गाणी गायल्यास अथवा म्हटल्यास भजनालाही वेगळाच साज चढतो.
देवा तुझ्या सेवेसाठी
गणेश चतुर्थीपासून खऱ्या अर्थाने भजनाला सुरुवात होते. भगवंतांचे नामस्मरण मनोभावे करण्यासाठी भजन मंडळे आणि त्यांचे सहकरी कोणतीही अपेक्षा न ठेवता भजनातून देवाच्या चरणी लीन होतात. आताच्या घडीला डिझेल, पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले असले तरी बाप्पाच्या सेवेसाठी तत्परता दाखवून प्रासादिक भजन मंडळे कमी किमतीचीही सुपारी घेतात. भजनातून देवाचे नामस्मरण करून भक्ती केली जाते.
खाद्य संस्कृतीचा मिलाप
अलीकडील काही वर्षात भजन संपल्यानंतर खाद्यप्रकारांची रेलचेल चाखायला मिळते. विविध खाद्य पदार्थ बनविण्याची स्पर्धा घरोघरी रंगल्याचे गणेशोत्सवात चित्र असते. मिसळ पाव, कांदा-पोहे, भजी, वडे, एवढेच नव्हे तर व्हेज राईस आदी इतर फास्टफूडचे पदार्थ भजनप्रेमीना चाखायला मिळत आहे. पूर्वी भजन म्हटलं की लाडू दिला जायचा. कित्येक वर्षे लाडवाने आपली जागा सोडली नव्हती. मात्र गेल्या सात-आठ वर्षात लाडू हळूहळू नामशेष होत चालला आहे. आजच्या युवाईला जीभेवर रेंगाळणारी चव हवी असते. ग्रामीण भागात भजन संपल्यावर तर शहरी भागात अगदी आरतीच्या वेळी सुद्धा नाविन्यपूर्ण पदार्थ दिले जातात.