मुलभूत सोयींची वानवा

By Admin | Updated: August 5, 2014 00:03 IST2014-08-04T22:46:50+5:302014-08-05T00:03:58+5:30

वन्यजीवांचा मुक्त संचार : कुसगाव ससेदुर्गाकडे पर्यटनातून लक्ष देणे गरजेचे

Basic features include: | मुलभूत सोयींची वानवा

मुलभूत सोयींची वानवा

सुरेश बागवे- कडावल .. कुसगावमधील ससेदुर्गावर पर्यटनाभिमुख सोयीसुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. येथील वैविध्यपूर्ण वन्य जीवसृष्टीची तहान भागविण्यासाठी बारमाही पाण्याची सोय झाल्यास विविध प्रजातींचे संवर्धन होईल. तसेच येथे आढळणाऱ्या दुर्मीळ सांबरांनाही संरक्षण मिळेल. यासाठी वन विभागाच्या पुढाकाराची आवश्यकता आहे.
कुसगाव-गिरगाव या गावांच्या पूर्वेस हा नैसर्गिक दुर्ग वसला आहे. ससेदुर्ग असे त्याचे प्रचलित नाव असले, तरी त्यावर कोणत्याही स्वरुपाचे ऐतिहासिककालीन बांधकाम नाही. अथवा इतिहासाची पाने चाळताना या दुर्गाचा कुठेही नामोल्लेख आढळत नाही. मात्र, या दुर्गाविषयी एक आख्यायिका सांगितले जाते. ती अशी की, या दुर्गावर बांधकाम करण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता. मात्र, येथील कडेकपारीतील सशांचा तसेच अन्य वन्य जीवांचा वावर लक्षात घेता त्यांच्या नैसर्गिक अधिवासात अडथळा निर्माण होणार होता. पर्यावरणासोबतच वन्य जीवांबाबतचा दूरगामी विचार करत महाराजांनी या ससेदुर्गावर बांधकाम करण्याचा बेत बदलला. तसेच दुर्गाची उंची प्रचंड असली, तरी त्याचे कडे शत्रू चलाखीने चढू शकेल, हेही कारण बांधकाम न होण्यामागे असावे. दुर्गाची नजरेत न सामावणारी उंची व त्याचा रांगडेपणा लक्षात घेता शालिवाहन, शिलाहार यासारख्या राजवटीत शत्रूपक्षाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी या दुर्गाचा उपयोग केला गेल्याचे सांगितले जाते.
ससेदुर्गाच्या पायथ्याशी एका बाजूे कुसगाव, गिरगाव तर पलीकडच्या पांग्रड गाव वसला आहे. दुर्ग चढून जाण्यासाठी दोन्ही गावांमधून सर्वसाधारण सारखाच वेळ लागतो. दुर्ग चढण्याचा अनुभव नसलेल्या व्यक्तीलाय दुर्गावर पोहोचण्यास दोन तासांचा वेळ लागतो.
ससेदुर्गाजवळील परिसरातील वन्य जीवांचा वावर ही नैसर्गिक देणगी असून ससे, हरण, साळींदर, खवले मांजर, गवारेडा, वनगायी, शेखरू, घोरपड या प्राण्यांबरोबच वाघ व बिबट्यांचाही या परिसरात वावर आहे. मात्र, हा परिसर प्रसिध्द आहे, तो मुक्तपणे संचार करणाऱ्या सांबरांसाठी. या परिसरात सांबरांचे कळप अनेकवेळा सहजरित्या दृष्टीस पडतात. पावसाळ्यात विपुल प्रमाणात गवतावर, तर उन्हाळ्यात विविध प्रकारच्या वृक्षांच्या पालवीवर सांबरांचा उदरनिर्वाह होतो.
नजीकच्या रांगणागडावर वाहनांच्या ताफ्यासह जाता येते. अशाप्रकारे ससेदुर्गावर पोहोचता येत नाही. त्यामुळे या वन्यप्राण्यांना संरक्षण प्राप्त झाले आहे.
ससेदुर्गावर ब्राम्हणस्थ नावाचे देवस्थान असून येथील पाषाणाची भाविकांकडून पूजा केली जाते. याठिकाणी असलेल्या बारमाही पाण्याच्या झऱ्यावरच येथील वन्यजीव सृष्टी तग धरून आहे. मात्र, अलीकडील काही वर्षात या पाण्याच्या स्त्रोताकडे लक्ष न दिल्याने झऱ्याचे पाणी अस्वच्छ व आटू लागले आहे. या दुर्गाची मालकी वनखात्याकडे आहे. वन्य जीवांची तहान भागविण्यासाठी या नैसर्गिक स्त्रोतांची काळजी वनखात्याकडून होण्याची आवश्यकता आहे.
उन्हाळ्यात या दुर्गाला वणव्याच्या ज्वालांमुळेही होरपळावे लागते. याबाबत तसेच परिसरात पाण्याची सोय होण्यासाठी वनखात्याने पुढाकार घेणे गरजेचे आहे. विविध कारणांनी सह्य पर्वतातील जैवविविध साखळी खंडित होत आहे. सह्याद्री पट्ट्यातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना ससेदुर्ग परिसरात वन्य जीवसृष्टी बहरलेली दिसून येते. पर्यटनाभिमुख सोयीसुविधा उपलब्ध झाल्यास रांगणा गडाप्रमाणे याठिकाणीही पर्यटक वळू शकतील.
साहसी गिर्यारोहकांसाठी रॅपलिंग करण्यासारखीही अनेक ठिकाणे येथे आहेत. दुर्गांचे सौंदर्य अबाधित राखून वन्यजीवांना कोणतीही बाधा होणार नाही, याची काळजी घेत पर्यटकांना सुविधा पुरविल्यास पर्यटक या दुर्गाकडे आकर्षित होतील. तसेच या परिसरातील बेरोजगानांही रोजगार उपलब्ध होऊन विकास होईल, असा विश्वास स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Basic features include:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.