बंदुकीच्या धाकाने वृद्धेला लुटले
By Admin | Updated: July 1, 2014 00:06 IST2014-07-01T00:01:23+5:302014-07-01T00:06:40+5:30
सावंतवाडीत घरात घुसून कृत्य : साडेआठ लाखांचे दागिने, साठ हजारांची रोकड लंपास

बंदुकीच्या धाकाने वृद्धेला लुटले
सावंतवाडी : शहरातील खासकीलवाडा येथील दत्तप्रसाद अपार्टमेंटमधील वंदना दत्ताराम शिंदे (वय ७२) या वृद्धेला बंदुकीचा धाक दाखवून दोन अज्ञात चोरट्यांनी लुटले. चोरट्यांनी सध्याच्या किमतीनुसार साडेआठ लाखांचे दागिने व ६० हजारांची रोख रक्कम लांबविली आहे.
ही घटना आज, सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. भरवस्तीत दिवसाढवळ्या पडलेल्या या दरोड्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे, तर दोन्ही संशयितांची रेखाचित्रे काढून त्यानुसार तपास सुरूआहे.
आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी खासकीलवाडा येथील वंदना शिंदे यांच्या घराच्या दरवाजाची बेल वाजविली. आपण कुरिअर कंपनीतून आलो असल्याचे सांगितले; परंतु शिंदे यांनी दरवाजा न उघडता कसलेही कुरिअर येणार नाही, असे सांगून त्यांना परतण्यास सांगितले. परंतु, युवकांनी याच इमारतीमधील वसंत करंदीकर यांचे नाव घेतल्याने त्यांनी तत्काळ दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच दोघेही घरात आले. शिंदेकडे त्यांनी पाण्याची याचना केली.
शिंदे पाणी आणण्यासाठी वळताच त्या दोघा चोरट्यांनी शिंदेंना बंदुकीचा धाक दाखवून तोंडावर चिकटपट्टी लावत बेडला साडीने बांधून ठेवले. नंतर त्या दोघांनी त्यांच्या अंगावरील व घरातील सर्व सोन्याचे दागिने काढून घेतले. तसेच कपाटातीलही काही मौल्यवान वस्तू आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला.(वार्ताहर)