रानडुकराचे मांस विक्रीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना जामीन मंजूर
By सुधीर राणे | Updated: February 26, 2024 17:49 IST2024-02-26T17:48:56+5:302024-02-26T17:49:22+5:30
कणकवली : रानडुकराचे मांस विक्रीच्या गुन्ह्यातील आरोपी गुरुनाथ येंडे आणि चंद्रकांत शिरवलकर यांची कणकवली न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर ...

रानडुकराचे मांस विक्रीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना जामीन मंजूर
कणकवली : रानडुकराचे मांस विक्रीच्या गुन्ह्यातील आरोपी गुरुनाथ येंडे आणि चंद्रकांत शिरवलकर यांची कणकवली न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.
फोंडाघाट येथे रानडुकराचे मांस विक्री करत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपी येंडे आणि शिरवलकर यांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर दोन्ही आरोपीना दोन वेळा वनकोठडी मिळाली होती. वनकोठडीची मुदत संपल्यावर सोमवारी आरोपींना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.
दरम्यान, या गुन्ह्यातील राधानगरी येथील मुख्य आरोपी अद्याप सापडला नसल्याचे कारण देत तपासी अधिकाऱ्यांकडून पुन्हा वनकोठडीची मागणी करण्यात आली. त्याला हरकत घेत अॅड. मिलिंद सावंत यांनी दोन्ही आरोपींनी तपासकामात सहकार्य केले आहे. राधानगरी येथील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी पुरेशी वनकोठडी देण्यात आली असून तपासकामासाठी पुरेसा अवधी मिळाला आहे. आदी मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणत आरोपीना वनकोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावण्याची मागणी केली.
अॅड.मिलिंद सावंत यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून कणकवली न्यायाधीश शेख यांनी दोन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अॅड. मिलिंद सावंत यांनी दोन्ही आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यासाठी युक्तिवाद केला.तपासकामी सहकार्य करणे, पुन्हा असा गुन्हा न करणे आदी शर्तींवर दोन्ही आरोपींची १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली.आरोपींच्या वतीने अॅड. मिलिंद सावंत यांनी यशस्वी युक्तिवाद केला.