शिवसेना पक्ष बांधणीसाठी विधानसभा मतदार संघ निहाय २७ एप्रिलला बैठका, कणकवलीतील कार्यालयाचे उदघाटन होणार
By सुधीर राणे | Updated: April 24, 2023 15:41 IST2023-04-24T15:41:05+5:302023-04-24T15:41:29+5:30
कणकवली: शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका २७ एप्रिलला होणार आहेत. या बैठकीला ...

शिवसेना पक्ष बांधणीसाठी विधानसभा मतदार संघ निहाय २७ एप्रिलला बैठका, कणकवलीतील कार्यालयाचे उदघाटन होणार
कणकवली: शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका २७ एप्रिलला होणार आहेत. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, उद्योजक किरण सामंत उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी दिली.
कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, जिल्हा खजिनदार भास्कर राणे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, शहरप्रमुख बाळू पारकर आदी उपस्थित होते.
संजय आग्रे म्हणाले, २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजण्याच्या कालावधीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक होणार आहे. दुपारी १२:३० ते १:३० च्या दरम्यान कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. दुपारी अडीच ते साडेचार दरम्यान ओरोस येथे जिल्हाधिकाऱ्यांसह विकासकामे आढावा बैठक होईल. तसेच सायंकाळी ५ वाजता कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
सायंकाळी ६ वाजता शिवसेना कणकवली तालुक्याच्यावतीने जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे पारितोषिक वितरण करण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी यावेळी केले.