The artwork from the painter's crush is in the interest of society: Madhusudan Nanivdekar | चित्रकाराच्या कुंचल्यातून घडणारी कलाकृती समाज हिताचीच :मधुसूदन नानिवडेकर
चित्रकाराच्या कुंचल्यातून घडणारी कलाकृती समाज हिताचीच :मधुसूदन नानिवडेकर

ठळक मुद्देचित्रकाराच्या कुंचल्यातून घडणारी कलाकृती समाज हिताचीच :मधुसूदन नानिवडेकरओलावा' चित्रप्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी रंगली गझल मैफिल

कणकवली:'रंगरेषातून आला पांघरून ओलावा..माणसाने माणसाला नेहमी आधार द्यावा...' अशा शब्दात गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांनी अखंड लोकमंच आणि सिधुदुर्गातील चित्रकारांच्या वतीने पुरग्रस्तांच्या  मदतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'ओलावा' चित्रप्रदर्शनाचे कौतुक केले.चित्रकार आपल्या कुंचल्यातून जी चित्रे रेखाटतो ते समाजनिर्मितिचे काम आहे.एक प्रकारे ही देशभक्ती आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मधुसूदन नानिवडेकर यांच्या उपस्थितीत 'ओलावा' चित्रपदर्शनाचा समारोप करण्यात आला. यावेळी अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक, व्ही.के.सावंत, मोहन कुंभार,कल्पना मलये, सरिता पवार, राजन चव्हाण , गोपीकृष्ण पवार,संतोष राऊळ, विनायक सापळे, अच्युत देसाई, महेंद्र चव्हाण, अजित पारधीये,श्रीमती पाटणकर,शैलजा कदम, योगदा राऊळ,मैत्रेयी चव्हाण,सुनील कांबळे,वेद पेडणेकर आदी सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मधुसूदन नानिवडेकर म्हणाले, ' जेथे काही उत्तम चाले,तेथे आपण जावे,त्यांच्यासंगे आपण आनंदाचे गाणे गावे.' असे आमचे तत्व आहे. जोंधळ्याचे तात्पुरते मोती झाल्यासारखे वाटतात . मात्र , ते शाश्वत नसते.शाश्वत असते ती फक्त कला.कवी असलेले कविमनाचे असतीलच असे नाही. कलेला कधीही मंदि नसते. असे सांगून आजच्या समाज व्यवस्थेवर त्यांनी भाष्य केले.समाजाशी संवाद साधतो तोच खरा कलाकार.अखंड लोकमंच सारख्या संस्था कार्यरत असल्या मुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिले आहे असेही ते म्हणाले.

मधुसूदन नानिवडेकर यांनी अनेक कविता आणि गझला यावेळी सादर केल्या.' या कालप्रवाहावरती मी दीप सोडला आहे..परी विझता विझता त्याने नवलाख दीप उजळावे ' , अशा कवितेतूनच त्यांनी रसिकानाही आवाहन केले.

' कसे मी जगावे स्वभावाप्रमाणे...
तुलाही हवा मी ठरावाप्रमाणे...
खुला राजरस्ता समोरून आहे
तरी धाप लागे चढावा प्रमाणे...
जुना बुटरस्ता फुलाना विचारी
नवा बूट वाजे खडावाप्रमाणे ..
असा राग येतो तुझा रोज जरी
तरी हसतो मी सरावाप्रमाणे...
अखेरीस ती त्यास सांगून गेली
अरे तू मला फक्त भावाप्रमाणे....'
त्यांनी सादर केलेल्या या गझलेने समारोप कार्यक्रमात रंगत आणली.
' तुझे नी माझे प्रेम केवढे
या दुनियेला आली भोवळ
धनादेश सत्तर रुपयांचा
पाऊणशे त्याची वटनावळ...
तू ते शंभर नंबरी सोने
काय द्यावी मी तुझी घडणावळ...' या कविते बरोबरच
' गाव हा राहिला नाही मोगऱ्याचा,
चेहऱ्याला वास येतो अत्तराचा
वाचले सारेच मी जाहीरनामे,

घोषणातून फरक नाही अक्षराचा ' या गझलेने त्यांनी समाज व्यवस्थेवर आसूड ओढले. त्यानंतर 'हरकत नाही' या कवितेने नानिवडेकर यांनी रसिकांची मने जिंकली. व्ही.के.सावंत यांच्या हस्ते नानिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला . मोहन कुंभार यांनी सुत्रसंचालन केले.

कणकवली येथे ' ओलावा' चित्रप्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचा सत्कार व्ही. के. सावंत यांनी केला. यावेळी नामानंद मोडक, मोहन कुंभार आदी उपस्थित होते.


Web Title: The artwork from the painter's crush is in the interest of society: Madhusudan Nanivdekar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.