झाप विणण्याची कला लोप पावतेय
By Admin | Updated: July 23, 2014 21:55 IST2014-07-23T21:41:59+5:302014-07-23T21:55:38+5:30
वापरही कमी : व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष

झाप विणण्याची कला लोप पावतेय
बाळकृष्ण सातार्डेकर - रेडी
कोकणात विशेषत: किनारपट्टीच्या भागात उन्हाळ्यात घरासमोरील मांडवावर टाकण्यासाठी आणि पावसाळ्यात शेतकऱ्यांची इरली, मच्छीमार बांधवांच्या होड्या, ट्रॉलर झाकण्यासाठी माडाच्या विणलेल्या झापांचा उपयोग केला जात होता. मात्र, सध्याच्या आधुनिक युगामध्ये प्लास्टिकच्या अतिवापरामुळे झाप विणण्याची कला काळानुरूप लोप पावत चालली आहे. त्यामुळे रेडीतील झाप विणकाम करणारे व्यावसायिक चिंताग्रस्त आहेत.
कोकणातील ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला पावसाळ्यात घर, परडे, शाकारणीसाठी पूर्वी माडाच्या झापाच्या पाती (चुडती) विणून तयार केलेल्या सुंदर झापांचा वापर होत असे. किनारपट्टीवर मच्छीमारी व्यवसाय बंद झाल्यानंतर होड्या, ट्रॉलर देखील या झापांनीच पूर्णपणे शाकारून पावसाळ्यात सुरक्षित ठेवल्या जात असत. मात्र, सद्यस्थितीत झापांची जागा प्लास्टिकने घेतल्याने ग्रामीण भागात झाप विणण्याची संख्या कमी झाली आहे.
कोकणात ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या घराजवळ नारळाचे झाड हमखास दिसते. या नारळाच्या झावळ्यांपासून झाप विणून तयार करून ती विकण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आजपर्यंत चालत आलेला आहे. फावल्या वेळात उपजीविकेचे साधन म्हणून हा व्यवसाय केला जात आहे. तरुणवर्गाला झाप विणण्याच्या व्यवसायामध्ये रस नाही. त्यामुळे झाप विणणारे कामगार व व्यावसायिक हळूहळू कमी झालेले दिसतात. प्लास्टिकच्या वापरामुळे विणलेल्या झापाला मागणी कमी होऊन ही कला व्यवसाय लोप होण्याच्या मार्गावर आहे. झाप विणकाम करतेवेळी आपल्या दोन्ही पायांवर गुडघे ठेवून बसून हातापायाची कसरत करून झापांच्या चुडत्या एकात एक घालून ते व्यवस्थित विणून झापाच्या दोन्ही बाजूला सुबक पद्धतशीरपणे गाठ्या मारून हे काम पूर्ण करावे लागते. हे काम करतेवेळी एका झापाला सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे लागतात. त्यामुळे गुडघ्यावर ताण पडून गुडघेदुखीसारखे आजारही जाणवू लागतात, असेही व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सध्या बाजारभावामध्ये एक साधे झाप तीन रुपये व विणकाम करावयास बारा रुपये खर्च येतो. त्यामुळे विणलेले झाप पंधरा रुपये दराने विक्रीला नेले जाते. या कामात कुटुंंबातील सर्वांचा हातभार लागतो. काळानुरूप मागणी कमी होत असल्याने विणकामाचा व्यवसाय बंद होणार की काय? या विवंचनेत व्यावसायिक आहेत.
शासनाने कारागिरांना मानधन द्यावे
हा व्यवसाय करतेवेळी रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ले व गोवा राज्यातून विणलेल्या झापाला विशेष मागणी येत असे. परंतु, गेली काही वर्षे या विणलेल्या झापाला मागणी नसल्याने हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाने इतर कलाकारांप्रमाणेच झाप विणकाम करणाऱ्या कारागीर आणि व्यावसायिकांनाही मानधन द्यावे.
- प्रकाश आजगावकर, व्यावसायिक, रेडी-म्हारतळेवाडी
झाप विणणाऱ्यांकडे समाजाचे दुर्लक्ष
शेतीबरोबरच मोकळ्या वेळात झाप व झाडू बांधून उपजीविकेचे साधन म्हणून हा व्यवसाय करून पोट भरले. परंतु आता हा व्यवसाय डबघाईला आला आहे. झापांचा वापर कमी झाल्याने या कलेला कोणीही विचारत नाही. याबाबत कोणालाही काहीच देणंघेणं नाही, याचेच जास्त दु:ख मनाला वेदना देते.
- अंकिता मांजरेकर, व्यावसायिक, रेडी-म्हारतळेवाडी
-कोकणामध्ये विशेष ग्रामीण भागात घराघरामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या झाडांच्या झावळांपासून हिर काढायचे, त्यातून उत्कृष्ट बांधणीची झाडू तयार करायची आणि उरलेली झापे ही घरासमोरील मांडवाला अगर पडवीला आडोसा म्हणून कृत्रिम भिंत तयार करण्यासाठी वापरली जायची. आजकाल ताडपत्र्या उपलब्ध झाल्याने कोकणातील झापांच्या भिंतीही दिसेनाशा झालेल्या असून हा व्यवसाय आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तसेच भावी पिढीला हा व्यवसाय करण्यात स्वारस्य नसल्याचेही चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.