आंबोलीत दंगल नियंत्रण पथक, कडक पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 15:36 IST2020-07-02T15:34:16+5:302020-07-02T15:36:26+5:30
आंबोली येथील धबधब्यावर तसेच अन्य पर्यटन स्थळावर येणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी दंगल नियंत्रक पथकाची मदत घेण्यात आली आहे.

आंबोलीत दंगल नियंत्रण पथक, कडक पोलीस बंदोबस्त
आंबोली : येथील धबधब्यावर तसेच अन्य पर्यटन स्थळावर येणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी दंगल नियंत्रक पथकाची मदत घेण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील धबधबे व पर्यटन स्थळे पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर आपत्कालीन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार मागच्या रविवार पासून याची अमंलबजावणी करण्यात आली. पहिलाच दिवस असल्यामुळे आलेल्या पर्यटकांना सोमवारी सुध्दा समज देवून सोडून देण्यात आले.
आता कारवाई तीव्र करण्यात येणार
मंगळवारपासून ही कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्यासाठी दंगल नियंत्रक पथकाची मदत घेण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर आदी सहकाऱ्यांना त्या ठिकाणी जबाबदारी देण्यात आली आहे. हे पथक मंगळवार पासून आंबोलीमध्ये दाखल झाले आहे.
सध्या वर्षा पर्यटन हंगाम असला तरी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केल्यामुळे आंबोलीचे वातावरण सुने सुने आहे. त्यातच जिल्हाधिकारी यांनी धबधब्यावर जाण्यास केलेली मनाई यामुळे आंबोलीत शांतता आहे.