हिवाळी पर्यटनात फुलपाखरांनी बहरली आंबोली
By Admin | Updated: January 2, 2016 08:28 IST2016-01-01T22:00:35+5:302016-01-02T08:28:55+5:30
आंबोली येथे हिवाळी पर्यटनात फुलपाखरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, पर्यटकांच्या आनंदात यामुळे भर पडली आहे.

हिवाळी पर्यटनात फुलपाखरांनी बहरली आंबोली
आंबोली : आंबोलीच्या डोंगररांगामध्ये सध्या भिरभिरणाऱ्या फुलपाखरांनी हिवाळी पर्यटनात आनंद निर्माण केला आहे. पावसाळा संपला की, फुलपाखरांच्या मिलनाचा काळ सुरू होत असून, या निमित्तानेच येथे मोठ्या संख्येने फुलपाखरे भिरभिरत आहेत.
आंबोलीतील जैवविविधता प्रसिद्ध आहे. त्यातील सुंदर असा घटक म्हणजे फुलपाखरू. सध्या आंबोलीतील वनांमध्ये या फुलपाखरांची मोठी मांदियाळी दिसून येत आहे. यामुळे नैसर्गिक हिरवाईच्या कुशीत या फुलपाखरांना पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. काही फुलपाखरे स्थलांतरित होऊन येतात. अगदी हिमालयापासून ते परराज्यातही पावसाळा संपला की फुलपाखरांच्या मिलनाचा काळ सुरू होतो. हजारो, लाखोंच्या संख्येने कॉमन क्रॉ, ग्लॉसी टायगर, स्ट्राईप टायगर, ग्लास येलो अशा फुलपाखरांचे मार्गक्रमण आंबोलीमार्गे तळकोकण असे सुरू होते. याचा मुख्य स्रोत घारपी असल्याचे समजते. पाणथळ जागा, मोठ्या प्रमाणावरील फुलझाडे, ओढे यांच्या शेजारी ही फुलपाखरे मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याचे फुलपाखरू अभ्यासक शुभम आळवे यांनी सांगितले. याशिवाय आंबोलीत महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन मोठ्या प्रमाणावर आढळते. भारतातील सर्वांत मोठा फुलपाखरू सोईन बर्डविंग हे फुलपाखरूही आंबोलीत आढळते. अशा प्रकारची २५० प्रकारची फुलपाखरे आंबोलीत सापडतात. यात क्रुझर, ब्ल्यू बोटल, मॅप, गोल्डन अॅगल, लेमन चॉकलेट, पेन्सी, लेमन पेन्सी या प्रकारच्या फुलपाखरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो. आंबोलीतील जैवविविधता इतिहासकाळापासून प्रसिद्ध आहे. नैसर्गिक सुंदरतेतील मनमोहक असा घटक म्हणून फुलपाखराला ओळखले जाते. फुलपाखरांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. या पर्यटकांच्या आनंदात भर घालणारा असा फुलपाखरांचा महोत्सव पुढच्या वर्षी आंबोलीत होणार आहे. त्यानिमित्ताने पर्यटनपे्रमींनी आतापासून या महोत्सवाची तयारी केली आहे. (वार्ताहर)