‘भुयारी गटार’वरून नेहमीच तंटा

By Admin | Updated: November 6, 2014 22:05 IST2014-11-06T21:56:57+5:302014-11-06T22:05:35+5:30

वेंगुर्लेवासीयांच्या अपेक्षा : नागरिकांना विश्वासात घेऊन विकास करण्याची गरज

Always screw up the 'subway' | ‘भुयारी गटार’वरून नेहमीच तंटा

‘भुयारी गटार’वरून नेहमीच तंटा

प्रथमेश गुरव - वेंगुर्ले --निसर्गसंपन्न अशा वेंगुर्ले तालुक्याला सद्यस्थितीत अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यात प्रामुख्याने शहरातील भुयारी गटार योजना, पाणी टंचाई, आरोग्याच्या सुविधा, मच्छिमारांच्या समस्या आदींचा समावेश आहे. या समस्या दिवसेंदिवस वाढत असून शासकीय आणि राजकीय पातळीवरून चालढकल होत असल्याने जनतेपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नवीन सरकारने या प्रश्नांकडे लक्ष पुरविल्यास जनतेचे हे प्रश्न नक्कीच सुटतील. नागरिकांच्याही या नवीन सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
वेंगुर्ले शहरात गाजलेला विषय म्हणजे भुयारी गटार. शहराच्या दृष्टीने जरी ही योजना आवश्यक असली, तरी येथील जनतेला विश्वासात घेणे आवश्यक आहे. भुयारी गटाराच्या देखभालीचा खर्च हा सर्वसामान्य जनतेला परवडणारा न राहिल्याने त्यांच्याकडून योजनेला प्रखर विरोध होत आहे. येथील घरेही एकमेकांना लागून असल्याने प्रत्येकजण दुसऱ्याचे सांडपाणी आपल्या जागेतून नेण्यास नकार देत आहे. तसेच शहरात काही भागात बसविण्यात आलेले चेंबर्स निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यांना भगदाडे पडण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी या सर्व गोष्टींमुळे जनतेचा भुयारी गटार योजनेला असलेला विरोध कायम आहे.
वेंगुर्ले शहराला निशाण तलाव आणि नारायण तलाव असे दोन तलाव लाभले आहेत. परंतु त्यांच्या निकृष्ट कामांमुळे येथील जनतेला पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक नळांना एप्रिलच्या अगोदरपासूनच पाणी पुरवठा कमी केला जातो. पाण्याच्या या समस्येमुळे एकदिवस आड पाणीपुरवठा केला जात असल्याने वेंगुर्लेतील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागतो. नगरपरिषदेच्या सार्वजनिक शौचालयाची तर दयनीय अवस्था झाली आहे. काही ठिकाणच्या शौचालयांचे स्लॅब लिकेज झाले असून पावसाळ्यात स्लॅबमधून गळती होत आहे. तसेच येथे असणाऱ्या नळांमध्ये बिघाड झाल्याने कित्येक लिटर पाणी वाया जात आहे.
वेंगुर्ले तालुका समुद्र किनारपट्टीच्या लगत असल्याने येथे मच्छिमारी समाज मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. बरीच कुटुंबे मच्छिमारी व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतात. समुद्रातील वादळ, पाऊस आदी नैसर्गिक आपत्तींना मच्छिमारांना वेळोवेळी तोंड द्यावे लागते. मच्छिमारांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने अनुदान मंजूर केले असले, तरी अनुदानापोटी येणारा खर्च कोट्यवधीच्या घरात असल्याने याबाबत नकार दर्शविला आहे.
शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या केरोसिनवरच येथील मच्छिमार व्यवसाय करीत आहे. परंतु शिधापत्रिकेवर २ ते ३ लिटर केरोसिन मिळत असल्याने मच्छिमारांना करोसिनसाठी वणवण भटकावे लागत आहे. जादा भावाने केरोसिन खरेदी करुन करावा लागणाऱ्या मासेमारीच्या व्यवसायाचीही शेतीसारखीच अवस्था होत आहे. यात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत आहे. मात्र, पारंपरिकतेने चालत आलेला हा व्यवसाय असून त्यावरच उदरनिर्वाह अवलंबून असल्याने मच्छिमारांची आर्थिकदृष्ट्या कोंडी होत आहे. याबाबत नवनिर्वाचित मत्स्य व्यवसायमंत्री एकनाथ खडसे यांच्याबरोबर येथील शिष्टमंडळ समस्यांविषयी चर्चा करणार असल्याची माहिती मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी दिली. वेंगुर्ले शहराला लाभलेला समुद्रकिनारा येथील जनतेला रोजगारासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, या किनाऱ्यांच्या समृध्दीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात आंबा व भातपिकही मोठ्या प्रमाणात घेतले जात असले तरी योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी व बागायतदारांना यातून नुकसानीच सहन करावी
लागत आहे.

डॉल्फीन दर्शनाचे आकर्षण


पर्यटन विकास आवश्यक
वेंगुर्ले तालुक्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. निळेशार समुद्र किनारे, आकर्षक मंदिरे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. येथील हॉटेल्स, निवास-न्याहारी योजना आदी पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असतात. पर्यटन विकासासाठी प्रयत्न केल्यास स्थानिकांना रोजगार मिळू शकतो.

शासनाने पर्यटकांना वॉटर स्पोटर्स, राहण्याच्या उच्च दर्जाच्या सोयी सुविधा, किनाऱ्यावर चेंजिंग रुम व अन्य सुविधा मिळाल्यास पर्यटक पुन्हा आकर्षित होतील.

निवती येथील डॉल्फीन दर्शनाचेही आकर्षण पर्यटकांना राहिल, मात्र, पर्यटनाच्या स्थळांची प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे.
वेंगुर्ले तालुक्यात भरपूर पर्यटनस्थळे आहेत. मात्र, या स्थळांकडे जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने ही पर्यटनस्थळे दुर्लक्षित राहिली आहेत. त्यामुळे हे रस्ते होणे आवश्यक आहे.

वेंगुर्ले तालुका

आरोग्याबाबत अनेक समस्या
तालुक्यात आरोग्याबाबतही समस्या असून तुळस, रेडी, आडेली व परूळे या ठिकाणी आरोग्य केंद्रे आहेत. मोठ्या आजारांच्या उपायांसाठी शहराकडे धाव घ्यावी लागते.
रेडी आरोग्य केंद्राला शिरोडा उपजिल्हा रुग्णालय जवळ आहे. तर तुळस,आडेली यांना वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय पर्याय आहे.
परंतु परूळे येथील आरोग्य केंद्र वेंगुर्लेपासून बऱ्याच अंतरावर असल्याने रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागते.

Web Title: Always screw up the 'subway'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.