Allotment of clearances at CM's hand to new entrepreneurs | नव उद्योजकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटप

नव उद्योजकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटप

ठळक मुद्देनव उद्योजकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटपमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजुरी पत्र

सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच नव उद्योजकांना उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात काल झालेल्या आढावा बैठकीत हे वाटप करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, परिवहन व संसदीय कार्यकमंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुख्य सचिव अजोय मेहता, पर्यटन सचिव वल्सा नायर, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड आदी उपस्थित होते.

सुक्ष्म व लघु उद्योगांच्या उभारणीस प्रोत्साहन मिळावे व त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 102 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरी मिळालेल्या या प्रस्तावांपैकी संतोष पराडकर, सुमित मेस्त्री, संजिवनी पाल्येकर, गणेश गावडे, सुयोग करंदीकर या पाच जणांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सेवा उद्योगासाठी 10 लाख रुपये व उत्पादन उद्योगांसाठी 50 लाख रुपयांपर्यतचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येतो. यामध्ये लाभार्थ्यांचा हिस्सा 5 ते 10 टक्के असून अनुदानाची रक्कम 15 ते 35 टक्के अशी आहे. ही योजना पूर्णपणे ऑनलाईन असून अधिक माहिती https://maha-cmegp.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

Web Title: Allotment of clearances at CM's hand to new entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.