वेंगुर्ला/सावंतवाडी : शिरोडा-वेळागर येथील समुद्रात बुडालेल्या सातजणांपैकी उर्वरित दोन व्यक्तींचे मृतदेह पोलिसांच्या शोध पथकाने तिसऱ्या दिवशी अथक प्रयत्नांनंतर अखेर रविवारी बाहेर काढले.इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (वय ३६, रा. लोंढा बेळगाव) यांचा मृतदेह सकाळी केळुस-निवती येथे, तर जाकीर निसार मणियार (१३, रा. कुडाळ) याचा मृतदेह वेंगुर्ला-नवाबाग येथे समुद्रात खोल पाण्यात आढळून आला. अखेर तो बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे आता सातही बेपत्तांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले असून, यातील पाचजणांचे बेळगाव, तर दोघांचे मृतदेह कुडाळ येथे नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.कुडाळ व बेळगाव येथील मणियार व कित्तूर कुटुंबीय शिरोडा-वेळागर येथे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आले होते. ते सायंकाळी समुद्राच्या पाण्यात मौजमजा करण्यासाठी उतरले असता मोठ्या लाटेने समुद्रात ओढले जाऊन नऊ व्यक्ती बुडाल्या होत्या. त्यापैकी इम्रान कित्तूर आणि इसरा इम्रान कित्तूर (दोघे रा. लोंढा, बेळगाव) यांना वाचविण्यात यश मिळाले होते, तर फरीन इरफान कित्तूर (वय ३४), इबाद इरफान कित्तूर (१३, रा. लोंढा, बेळगाव) आणि नमिरा आफताब अखतार (१६, रा. लोंढा, जि. बेळगाव) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह सापडले होते, तर उर्वरित इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (३६), इकवान इमरान कित्तूर (१५, दोन्ही रा. लोंढा बेळगाव), फरहान महम्मद मणियार (२५, गुढीपूर, कुडाळ) व जाकीर निसार मणियार (१३, रा. गुढीपूर, कुडाळ) हे चारजण समुद्रात बुडून बेपत्ता होते. सायंकाळी उशिरा अंधार पडेपर्यंत स्थानिकांच्या मदतीने स्थानिक बोटीच्या साहाय्याने शोध चालू होता. मात्र, समुद्र खवळलेला असल्याने शोधकार्यात व्यत्यय आल्याने शेवटी शुक्रवारी उशिरा सायंकाळी अंधार पडल्यावर शोधमोहीम थांबविण्यात आली होती. मात्र, त्याच रात्री उशिरा फरहान महम्मद मणियार (२५, रा. गुढीपूर, कुडाळ) याचा मृतदेह सागरतीर्थ समुद्र किनारी आढळला, तर इकवान इमरान कित्तूर (१५) याचा मृतदेह शनिवारी सकाळी मोचेमाड समुद्र किनारी आढळला. या दुर्दैवी घटनेत बुडालेल्या एकूण सातजणांपैकी इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (३६), जाकीर निसार मणियार (१३) यांचे मृतदेह अद्यापपर्यंत मिळाले नव्हते. ते शोधण्यासाठी प्रयत्न सुरू होते. रविवारी समुद्रात खोल पाण्यात ते मृतदेह आढळून आले. अखेर ते बाहेर काढण्यात यश आले आहे.यातील इरफान यांचा मृतदेह केळुस-निवती येथील समुद्रातून बाहेर काढण्यात आला. निवती पोलिस ठाण्याचे अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार कांदळगावकर, सोनसुरकर, कदम, गोसावी, कुंभार यांनी ही कारवाई केली, तर जाकीर याचा मृतदेह नवाबाग येथून समुद्रात सुमारे ६ किलोमीटर आतून बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला.
शोधमोहिमेसाठी मत्स्य विभागाचे ड्रोनवेंगुर्ला पोलिस ठाण्याचे अधिकारी पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलिस उपनिरीक्षक दाभोळकर, राठोड आणि अंमलदार कदम, सराफदार, राऊळ, पीएन तांबे, जोसेफ, पीसी सरमळकर, देसाई, मांजरेकर, परुळेकर यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. दोन्ही मृतदेहांची खात्री त्यांच्या नातेवाइकांनी केली आहे. या शोधमोहिमेसाठी मत्स्य विभागाचे ड्रोन वापरण्यात आले. तसेच प्रांताधिकारी हेमंत निकम व तहसीलदार ओंकार ओतारी यांचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.